कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दुसऱ्यांदा निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:20 PM2018-03-17T23:20:20+5:302018-03-17T23:20:20+5:30
शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे. यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा कुतुहलाचा विषय असला तरीही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे .....
कपिल केकत ।
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे. यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा कुतुहलाचा विषय असला तरीही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे काढण्यात आलेल्या पहिल्या निविदेतून दिसून येत आहे. परिणामी नगर परिषदेवर दुसºयांदा निविदा काढण्याची पाळी आली आहे.
शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्रीला घरातून निघणे धोकादायक झाले आहे. हे बेवारस कुत्रे कधी कुणाचा चावा घेतील याचा काही नेम नाही. त्यामुळे बेवारस कुत्र्यांना बघूनच शहरवासी घाबरत आहेत. शहरवासियांची ही समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. शहरातील वातारवरणाच्या दृष्टीने हा प्रस्ताव योग्य असल्याने सर्वानुमते या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान कुत्र्यांच्या निर्बिजकरणाच्या या कामासाठी नगर परिषद स्वच्छता विभागाने जानेवारी महिन्यात निविदा काढली होती. फेब्रुवारी महिन्यात निविदा उघडण्यात आल्या असता आश्चर्याची व तेवढीच खेदाची बाब अशी की, या निविदेवर कुणीही अर्ज टाकला नाही. यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम होऊ शकले नाही. नगर परिषदेने या विषयावर ठराव घेतला असल्याने तसेच शहरवासीयांच्या हिताचा हा विषय असल्यामुळे स्वच्छता विभागाला हे काम करणे गरजेचे झाले आहे. परिणामी, स्वच्छता विभाग आता पुन्हा दुसºयांदा निविदा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
बेवारस कुत्र्यांनी घेतला होता चावा
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात दिवाळीच्या काळात बेवारस कुत्रा पागल होऊन त्याने कित्येकांना चावा घेतला होता. अशीच एक घटना त्यानंतरही ही घडल्याची माहिती आहे. कुत्रा पागल होऊन चावा घेत असल्याने समोरच्या व्यक्तीच्या जिवालाही धोका होऊ शकतो. यावर नगर परिषद स्वच्छता विभागाकडूनच त्या कुत्र्याला ठार करण्यात आले होते अशी माहिती आहे. ही घटना बघता लवकरात लवकर कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करणे अपेक्षीत आहे. मात्र आता यंदाही कुणी निविदा टाकून पुढे येतो काय हे बघावयचे आहे.