निविदा अडली, मात्र सोलर लाईट लागले
By admin | Published: June 22, 2017 12:13 AM2017-06-22T00:13:17+5:302017-06-22T00:13:17+5:30
तालुक्याच्या ग्राम पंचायत पोवारीटोला येथे १४ वा वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या कामात अनियमीतता
ग्रामसेविकेला कारणे दाखवा : पोवारीटोला ग्रामपंचायतचा अजब कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्याच्या ग्राम पंचायत पोवारीटोला येथे १४ वा वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या कामात अनियमीतता करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ग्रासेविका एस.बी. खोब्रागडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवले आहे. निवीदा प्रक्रीया पूर्ण न करताच या गावात सोलर लाईट लावण्यात आल्याचा मुद्दा गाजला आहे.
सोलर लाईट खरेदी संदर्भात दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर निविदा सूचना ग्राम पंचायतने प्रकाशीत केली. खरेदी करायच्या साहित्याप्रमाणे अटी दर्शविण्यात आले नाही. निविदा १० सौर ऊर्जा लाईट करीता मागविण्यात आल्या. निविदा ५० हजार रुपये पेक्षा जास्त रकमेच्या होत्या. दोन निवीदा असल्यामुळे फेरनिविदा काढणे आवश्यक होते. परंतु तसे केले नाही सदर काम ग्रामसेवक, सरपंच यांनी नियमबाह्य करून कामात अनियमितता केल्याचे चौकशीत म्हटले आहे. महाराष्ट्र जिल्हा सेवा शिस्त अपिल नियम १९६४ व जिल्हा सेवा वर्तणुक नियम १९६७ चे उलंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्राम पंचायतने हातपंप साहित्य खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याकरिता ७ दिवस देणे अपेक्षीत होते परंतु ग्राम पंचायतने १८ दिवसाची मुदत दिली होती. निविदा न काढता मोगम स्वरुपाचे निविदा काढून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. सामान्य निधीमधून रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुझविण्याकरिता माँ दुर्गा सिमेंट अॅन्ड लोहा एजेन्सी यांच्यामार्फत प्रमाणक क्रमांक ४० व प्रमाणक क्रमांक ४९ अन्वये एकूण १० ट्राली मुरुम व प्रमाणक क्रमांक ७६ प्रमाणे २० ट्राली माती टाकल्याचे दिसून आले. कामावर माती व मुरुम पसरविणाऱ्या मजुरांना नमूना १९ प्रमाणे ५ हजार रुपये देण्यात आले आहे. ग्राम पंचायतचे लेखा संहितेप्रमाणे बांधील पुस्तकात ठेवणे बंधनकारक आहे.
परंतु ग्राम पंचायतचे दस्ताऐवजांच्या तपासणीअंती मासीक सभा इतिवृत्त हे बांधील स्वरुपाचे नसून प्रत्येक सभेकरिता संगणीकृत प्रत काढून इतिवृत्त लिहीले असल्याचे दिसून आले. यामुळे सभेत इतिवृत्तात बदल करणे किंवा दुसरे ठराव सभेच्या परवानगी न घेता लिहिण्यात आले असेल, आपण या कामात ग्रासेविकेने निष्काळजीपणा केला आहे.
ग्राम पंचायत पोवारीटोला येथे १६ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी भेट दिली असता सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे घर कर व पाणी कर वसूली ४० टक्के केले असल्याचे आढळले. परंतु शासन परिपत्रक क्र.पीआरसी/१०७६/२३३५/२३, ३१ जानेवारी १९७७ अन्वये ७० टक्के कर वसूली करणे बंधनकाक आहे. परंतु पंचायत राज कमिटीने दिलेल्या निर्देशांची व शासन परिपत्रकाची अवहेलना ग्रामसेविका करीत आहे.
घर कराची रक्कम खिशात
पोवारीटोला ग्रामपंचायतचे सन २०१६-१७ चे सामान्य रोकड वही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासले असता खातेदारांना दिलेली पावती व रोकड वहीत नोंदविलेली रक्कम यात तफावत आढळली. नमूना १० चे पावती क्रमांक २२ सदाशिव मेहतर मारबदे यांच्या नावाने ३४० रुपयाची पावती कापण्यात आली व रोकड वहीत फुलेश्वरी मारबदे यांच्या नावाने २९० रुपये लिहण्यात आले. पावती क्रमांक ९१ परमानंद कनिलाल शहारे यांच्या नावे ७३० रुपये नोंदविण्यात आहे. परंतु रोकड वहीत कनिलला शहारे यांच्या नावे २९५ रुपये लिहले आहे. पावती क्रमांक २१ रामकृष्ण लटारु ब्राम्हणकर यांच्या नावे ९०१ रूपये आहेत. परंतु रोकड वहीत कमी नोंदवून अफरातफर केली आहे. ग्राम निधीत घर कराची ज्यादा रकमेची पावती कापून प्रत्यक्ष निधीत कमी रक्कम जमा करुन पैश्याची अफरातफर केली आहे. मुंबई ग्रामपंचायत (ग्रामनिधी अभिरक्षा व गुंतवणूक) नियम १९५९ चे पालन केले नाही त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार आहे.