तेंदूपत्ता मजुरांना दोन वर्षांपासून बोनस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:05+5:302021-09-27T04:31:05+5:30
शेंडा कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या शेकडो मजुरांना मागील दोन वर्षांपासून बोनस मिळाला नाही. ...
शेंडा कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या शेकडो मजुरांना मागील दोन वर्षांपासून बोनस मिळाला नाही. वारंवार या प्रकाराकडे लक्ष वेधूनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कानाडोळा करत असल्याचे लाभार्थी बोलत आहेत.
सन २०१९ पासून शेंडा, मसरामटोला, आपकारीटोला, कोयलारी, प्रधानटला, पांढरवाणी व आजूबाजूच्या खेड्यातील मजुरांनी तेंदूपत्ता संकलन केले होते. ग्रामीण भागात हिंस्र वन्य प्राण्यांची पर्वा न करता लहान लेकरांसह अख्खे कुटुंब अगदी पहाटेलाच जंगलात जाऊन तेंदूपानाची तोडणी करतात. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र दोन वर्षे लोटूनही वन विभागाने मजुरांच्या खात्यात पैसेच जमा केले नाही. हा एक प्रकारे शासनाच्या धोरणाचा भंग आहे. मजुरांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने उपासमार होत आहे. या परिसरात शेती व्यवसायाशिवाय इतर दुसरे रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. हक्काचे पैसे मिळत नसल्याने ही एक प्रकारची मजुरांची थट्टाच आहे. वारंवार या प्रकाराकडे लक्ष वेधूनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तरी या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष पुरवून बोनसची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्याची मागणी तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांनी केली आहे.