अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनचे आमदारांना ‘टेंशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:18+5:30
गोंदिया जिल्ह्याला नक्षलग्रस्त असा ठपका लागल्याने अधिकारी-कर्मचारी गोंदियाला येण्याचे टाळतात. शासनाने पाठविलेच तर कित्येक सुटी घेऊन बसतात किंवा नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वशिला लावून आपली बदली करवून घेतात. मात्र ज्यांच्याकडे हे शस्त्र नाहीत ते मात्र विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार आपलेही वेळापत्रक ठरवून जनता व कार्यालयाला सेवा देतात.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार ठरते असे आता नागरिक बोलू लागले आहे. याचा परिणाम मात्र संबंधित विभागातील कामकाजावर होत असून सर्वसामान्य जनतेची फरफट होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनचा मुद्दा तारांकीत प्रश्न लावून विधानसभेत मांडला आहे. त्यामुळे आता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनवर काय कारवाई होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्याला नक्षलग्रस्त असा ठपका लागल्याने अधिकारी-कर्मचारी गोंदियाला येण्याचे टाळतात. शासनाने पाठविलेच तर कित्येक सुटी घेऊन बसतात किंवा नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वशिला लावून आपली बदली करवून घेतात. मात्र ज्यांच्याकडे हे शस्त्र नाहीत ते मात्र विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार आपलेही वेळापत्रक ठरवून जनता व कार्यालयाला सेवा देतात. ही बाब सर्वश्रूत असून कित्येक अधिकारी व नेते आले नी गेले मात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या या वागणुकीवर काहीच औषध कुणालाही मिळाले नाही. परिणामी संबंधित कार्यालयांतील कामकाजावर त्याचा परिणाम होत असून ‘साहेब’ नसल्याने सर्वसामान्य जनतेला फक्त चकरा माराव्या लागतात. जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी विदर्भ एक्स्प्रेसला जास्त पसंती देतात. सकाळी ११.३० वाजता येणे व दुपारी २.५५ वाजता निघून जाणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. त्यातही दुसरा व चवथा शनिवार आल्यास शुक्रवारीच सुटी टाकणे हा प्रकार येथे सुरू आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेने मात्र येथील आमदार विनोद अग्रवाल यांचे ‘टेंशन’ वाढविले आहे. लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकारी-कर्मचारी जागेवर असणे गरजेचे असल्याने त्यांनी हा गंभीर प्रश्न थेट विधानसभेत तांराकीत प्रश्न लावून मांडला आहे.
विशेष म्हणजे, या विषयाला घेऊन येथील जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या उपसचिवांनी पत्र पाठविले असून त्यांच्याकडून या प्रश्नाला घेऊन वस्तुस्थिती काय ते २४ तारखेपर्यंत कळविण्यास सांगीतले आहे. त्यामुळे आता प्रश्नाला घेऊन पुढे काय होते याकडे सर्वांच्या नजरा आहे.
विदर्भ एक्स्प्रेस आवडती गाडी
नागपूरवरून गोंदियाला येऊन पुन्हा नागपूरला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस अत्यंत उपयुक्त अशी गाडी आहे. ही गाडी सकाळी ११.३० वाजतादरम्यान गोंदियाला येत असून दुपारी २.५५ वाजता पुन्हा नागपूरला जाते. त्यामुळे कुणीही येथील आपली कामे आटोपून याच गाडीने जाऊ शकतो. नेमका हाच फायदा अधिकारी-कर्मचारी घेत असून नागरपूवरून सकाळी याच गाडीने येतात. दुपारी २ वाजतापर्यंत कार्यालयात घालवून पुन्हा हीच गाडी पकडून ते नागपूर गाठतात. म्हणूनच विदर्भ एक्स्प्रेस अशा अपडाऊन बहाद्दरांची आवडती गाडी असून या अपडाऊन करणाºयांना यामुळेच ‘विदर्भवीर’ संबोधले जाते.