पांदन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यावरुन तणाव ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:40+5:302021-02-26T04:42:40+5:30
इसापूर : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला ग्रामपंचायतमध्ये गुरुवारी (दि.२५)पांदन रस्त्याच्या बांधकामाला घेऊन सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायतसमोर आंदोलन केले. २०१४-१५ पासून ...
इसापूर : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला ग्रामपंचायतमध्ये गुरुवारी (दि.२५)पांदन रस्त्याच्या बांधकामाला घेऊन सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायतसमोर आंदोलन केले. २०१४-१५ पासून अपूर्ण असलेला पांदन रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. अतिक्रमणामुळे पांदण रस्त्याचे काम अडले असून ते अतिक्रमण काढून रस्ता पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली, यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर गावकरी शांत झाले.
प्राप्त माहितीनुसार कोरंबीटोला ग्रामपंचायतने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये कुठन बोडी ते सावरी नाला पांदन रस्ता बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करुन ४ मार्च २०१६ ते ११ मे २०१६ या कालावधीत रस्त्याचे. काम सुरू केले. काम सावरी नाल्याकडून सुरू करण्यात आले. मात्र गावाजवळ काम आल्यावर अंदाजे शंभर मीटर अंतरात चार जणांनी पांदन रस्ता जाणाऱ्या ठिकाणावरून भिंतीचे अतिक्रमण असल्याने हे काम अपूर्ण होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात वहिवाटी करण्यासाठी अडचणी निर्माण झाली होती. सन २०१६ पासून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत व वरिष्ठांकडे अनेकदा रस्ता बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करून सुद्धा ती पूर्ण होत नव्हती. अखेर गुरुवारी कोरंबीटोला ग्रामवासीयांनी ग्रामपंचायतमध्ये एकत्र येऊन याविरुध्द आंदोलन केले. याची माहिती अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी राजू वलथरे, रोजगार हमी योजनेचे नंदू रामटेके, ग्रामसेवक पारधी यांना देण्यात आली. ते ग्रामपंचायतमध्ये पोहोचले असता गावकऱ्यांनी रस्ता बांधकाम पूर्ण करण्याची मागणी होईपर्यंत अधिकाऱ्यांना गावातून परत जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या पांदन रस्त्याचे कामाचे मस्टर काढून लवकरच काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.