आदिवासी गर्भवतींची ‘माहेर’कडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 08:45 PM2019-04-23T20:45:02+5:302019-04-23T20:45:31+5:30

आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘माहेरघरां’कडे आदिवासी भागातील गर्भवतींनी पाठ केली आहे.

Text to Tribal Pregnant 'Maher' | आदिवासी गर्भवतींची ‘माहेर’कडे पाठ

आदिवासी गर्भवतींची ‘माहेर’कडे पाठ

Next
ठळक मुद्देअनेक माहेरघर कुलूपबंद : दरेकसा येथे वर्षभरात एकही गर्भवती गेली नाही

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘माहेरघरां’कडे आदिवासी भागातील गर्भवतींनी पाठ केली आहे. जिल्ह्यातील दरेकसा येथील माहेरघरात वर्षभरात एकही गर्भवती राहिली नाही.
बहुतांश आदिवासी लोक डोंगराळ भागात वास्तव्य करतात. जिल्ह्यात आदिवासींच्या बहुतांश गावात पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे गर्भवती महिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी सोय नाही. दुरध्वनी सेवा खंडीत व मोबाईलचीही समस्या होते. यामुळे योग्य उपचाराअभावी आदिवासी गावांत बाल व माता मृत्यूचे प्रमाण अधिक असते. या स्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक आदिवासी गावात महिलांसाठी सन २०१०-११ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. यांतर्गत जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘माहेरघर’ तयार करण्यात आले.
सुरक्षित व आरोग्य संस्थेत प्रसूती करण्यासाठी गर्भवती महिला व तिच्या बालकाला राहण्याची सोय करून देण्यासाठी ‘माहेरघर’ ही योजना अंमलात आणण्यात आली. सुरक्षीत व वैद्यकीय संस्थेतच सुरक्षीत बाळंतपण व्हावे यासाठी गर्भवती व प्रसूती झाल्यानंतर माता व बाळाला निवासाची सोय म्हणून ‘माहेरघर’ बांधण्यात आले. परंतु या ‘माहेरघरां’कडे आदिवासी भागातील गर्भवती महिलांनी पाठ फिरविली आहे.
गर्भवतींना प्रसूतीच्या दोन दिवसाआधीच त्या ‘माहेरघरा’त दाखल करून डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात येते. गर्भवतींना संदर्भ सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग बाध्य असल्यामुळे त्या ‘माहेरघरा’चा लाभ गर्भवती महिलांना घेता येऊ शकते. परंतु त्या ‘माहेरघरां’ना आजघडीला कुलूप लागल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
केशोरीत सर्वाधिक ७९ गर्भवतींनी घेतला लाभ
जिल्ह्यात देवरी तालुक्यातील मुल्ला, घोनाडी, ककोडी, अर्जुनी-मोरगावच्या केशोरी, गोठणगाव, कोरंभीटोला, महागाव, चान्ना बाक्टी, सडक अर्जुनीच्या शेंडा, पांढरी, सालेकसाच्या कावराबांध, दरेकसा व बिजेपार असे १३ ‘माहेरघर’ आहेत. मुल्ला येथील माहेरघरात १७ गर्भवतींनी लाभ घ्यायला पाहिजा होता. परंतु फक्त ९ गर्भवतींनी लाभ घेतला आहे. घोनाडी येथे ५१ पैकी ३२, ककोडी ३६ पैकी १६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात केशोरी येथे १३१ पैकी ७९, गोठणगाव २४ पैकी २२, कोरंभीटोला ४६ पैकी २७, महागाव ५५ पैकी १६, चान्ना-बाक्टी २५ पैकी २६ ने लाभ घेतला आहे. उद्दीष्टापेक्षा एक लाभार्थी जास्त झाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात शेंडा येथे ३० पैकी २५, पांढरी ४१ पैकी १०, सालेकसा तालुक्यात कावराबांध २६ पैकी ३, दरेकसा येथे एकानेही लाभ घेतला नाही. बिजेपार येथे २९ पैकी फक्त ५ महिलांनी माहेरघराचा लाभ घेतला.
माहेरघरासाठी तीन लाख खर्च
जिल्ह्यातील आदिवासी भागात उभारण्यात आलेल्या माहेरघराचा लाभ घेणाºया गर्भवतींना बुडीत मजूरी मिळावी म्हणून २०० रूपये दराने प्रत्येक दिवसाची बुडीत मजूरी दिली जाते. त्यांच्या जेवणाची सोय बचत गटाच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी बचत गटाला प्रत्येक लाभार्थ्याच्या मागे २०० रूपये दिले जातात. गर्भवतींना सर्व सोयी सुविधा असलेले स्वतंत्र कक्ष देण्यात येते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात २७० गर्भवतींनी या माहेरघराचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावर ३ लाख १ हजार २०० रूपये आरोग्य विभागाने खर्च झाले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. अशा स्थितीत गर्भवतींचा जोखमेपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षीत प्रसूतीसाठी ‘माहेरघर’ योजना उत्तम आहे. बाल व माता मृत्यू थांबविण्यासाठी ही योजना आहे. गर्भवती बरोबर एका नातेवाईकाचीही सोय या ठिकाणी केली जाते. आदिवासी महिलांनी याचा लाभ घ्यावा.
-डॉ. श्याम निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गोंदिया

Web Title: Text to Tribal Pregnant 'Maher'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य