‘धादरी’ गाव तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:20 PM2018-04-12T21:20:28+5:302018-04-12T21:20:28+5:30

उन्हाळ्याची धग आता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली. मात्र तिरोडा तालुक्यातील धादरी येथे पाण्याचा मुबलक साठा असूनही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

Thaadari village thirsty | ‘धादरी’ गाव तहानलेलेच

‘धादरी’ गाव तहानलेलेच

Next
ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना बंद : बोअरवेलमधून येते पिवळसर पाणी, महिलांची पायपीट

देवानंद शहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्याची धग आता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली. मात्र तिरोडा तालुक्यातील धादरी येथे पाण्याचा मुबलक साठा असूनही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. प्रशासनासह पदाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष असल्याने गावकऱ्यांमध्ये चांगलाच रोष व्याप्त आहे.
धादरी-उमरी येथे सन २०१४-१५ मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. वाहत्या नाल्याला समांतर भागातच पाण्याची टाकी तयार करण्यात आली. टाकीच्या नळांचे व पाईप लाईनचे कार्यसुद्धा त्याच काळात पूर्ण झाले. उरलेले कार्य सन २०१५-१६ मध्ये पूर्ण करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनी पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले. आता आपल्या घरापर्यंत पाणी पोहचेल. त्यामुळे पायपीट थांबेल, अशी आशा महिलांसह गावकऱ्यांमध्ये होती. त्यानुसार सन २०१७ च्या जून महिन्यात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, केवळ पंधरा दिवस पाणी पुरवठा केल्यानंतर पाणी पुरवठा योजनाच बंद झाली. तेव्हापासून आजतागायत पाणी पुरवठा योजना बंदच आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळापासून योजना बंद असल्याने आता गावकऱ्यांना बोअरवेलमधून पाणी काढून पाणी प्यावे लागत आहे. बोअरवेलला पिवळसर पाणी येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धादरी-उमरी गावातून मोठा नाला वाहतो. नाल्यात पाण्याचा मुबलक साठा आहे. याच पाण्यावर अनेक शेतकरी दुबार पीकसुद्धा घेतात. पाणी पुरवठा योजना यशस्वी व्हावी, गावकऱ्यांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये, म्हणूनच थेट नाल्याच्या पात्रातच टाकीचे निर्माण करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम झाल्याने योजना अल्पावधीत बंद पडल्याची चर्चा गावात रंगली आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना राबवून गावकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी मोठा निधी सुद्धा देण्यात आला. धादरी-उमरी येथील योजनेसाठी शासनाचे लाखो रूपये खर्च झाले. परंतु प्रशासनाचे वेळकाढू धोरण व पदाधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शासनाच्या लाखो रूपयांवर पाणी फेरले आहे. या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कुठलेच उत्तर मिळत नसल्याची तक्रारसुद्धा गावकºयांनी केली आहे. योजनेची चौकशी करून तात्काळ सुरूवात करण्याची मागणी गावकºयांची आहे.
प्रकल्पाचे दूषित पाणी
धादरी-उमरी येथून वाहणाऱ्या नाल्यात वीज प्रकल्पाचे पाणी सोडले जाते. हेच पाणी नळ योजनेच्या टाकीमध्ये झिरपते. विशेष म्हणजे प्रकल्पाच्या पाण्यामुळे अनेकवेळा नाल्यातील मासे मेलेली आढळत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेवर पाणी शुद्धीकरण यंत्र लावण्याची गरज आहे. नळ योजना सुरू असताना गढूळ पाणी आले असल्याचे सुद्धा गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वीज प्रकल्पाने या ठिकाणी फिल्टर अथवा आरओ लावण्याची मागणी करीत प्रकल्पाच्या वेळकाढू धोरणावरसुद्धा गावकºयांनी रोष व्यक्त केला आहे.
पाण्यासाठी जीव द्यायचा का?
वयाची पंच्याहत्तरी उलटली. घरात दोघेच पतीपत्नी आहेत. त्यातही पत्नी आजारी आहे. अशात घरातील सर्वच कामाची जबाबदारी पार पाडत या वयात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागते. नळाला पाणी येत नसल्याने बोअरवेलवरून भर उन्हात पाणी आणताना धापा लागतात. प्रसंगी पिण्यासाठी सहा किलोमीटर अंतरावरील तिरोडा येथून पाणी विकत आणावे लागते. या संदर्भात अनेकवेळा ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करूनही ग्रामपंचायतीकडून योग्य उत्तर मिळत नाही. आता पाण्यासाठी जीव द्यावा का? असा सवाल सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक ताराचंद चव्हाण यांनी व्यक्त केला.

Web Title: Thaadari village thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी