परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 10:34 PM2022-11-19T22:34:42+5:302022-11-19T22:35:03+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. येथे नवेगावबांध तलाव, इटियाडोह धरण व सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. तलावांची संख्या भरपूर आहे. येथील हिवाळा ऋतूतील वातावरण पक्ष्यांना पोषक असे आहे. खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व बाबी पोषक असल्याने विदेशी पक्षी स्थलांतर करीत येथे दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यांचे आगमन साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होते.

The arrival of foreign visitors was delayed | परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले

परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले

googlenewsNext

संतोष बुकावन
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे परदेशी पाहुणे आकाशातून उडत-उडत जिल्ह्यातील जलाशयांवर साधारणतः ऑक्टोबर महिन्यात दाखल होतात. मात्र, या वर्षी त्यांचे आगमन लांबले आहे. पानवठ्यावर केवळ तुरळक प्रजातीच्या पक्ष्यांचेच आगमन झाले आहे. अनेक पाणवठ्यांवर तर अद्याप पक्षी आलेच नाहीत. परदेशी पाहुण्यांचे आगमन का लांबले, हा प्रश्न पक्षी निरीक्षक व अभ्यासकांना पडला आहे. जे स्थलांतरित पक्षी आले आहेत ते सध्या लक्ष वेधून घेत आहेत. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानानजीकच्या बीड-भुरसीटोला तलावावर शेकडोंच्या संख्येत पक्षी दाखल झाले आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. येथे नवेगावबांध तलाव, इटियाडोह धरण व सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. तलावांची संख्या भरपूर आहे. येथील हिवाळा ऋतूतील वातावरण पक्ष्यांना पोषक असे आहे. खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व बाबी पोषक असल्याने विदेशी पक्षी स्थलांतर करीत येथे दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यांचे आगमन साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी व खाद्याची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात साता समुद्रापार येऊन राहतात. प्रतिकूल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हेसुद्धा स्थलांतराचे एक कारण मानले जाते.
स्थलांतरित पक्षी युरोप, सायबेरिया, मंगोलिया तसेच हिमालयाकडून भारतात प्रवेश करतात. जलाशय व पाणवठ्यावरील पक्ष्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप होत असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसून येते. गतवर्षी चोरखमारा तलावात विषारी खाद्य व जल प्राशनामुळे पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली होती. तलाव व जलाशयांच्या काठावर शेतीचे अतिक्रमण वाढले आहे. या शेतीत होणाऱ्या विषारी कीटकनाशक द्रव्यांचे सेवन केल्यानेही पक्षी मृत्युमुखी पडतात. प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याचे जाणवते. काही भागात विदेशी पक्ष्यांची शिकारसुद्धा होत असते. याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.

पक्षी हा जीव आहे. विज्ञान विषयाच्या अभ्यासाचा एक भाग आहे. हजारो मैल स्थलांतर करून ते आपल्या देशात क्षणिक वास्तव्यास येतात. यामुळे आकर्षण वाढते. पक्षी अभ्यासक व पक्षिप्रेमींसाठी हा काळ पर्वणी ठरतो. त्यांच्या संरक्षणाची सुजाण नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. यापासून आपले कोणतेही नुकसान नाही. एक कर्तव्य म्हणून पक्षी संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.
                  - प्रा. अजय राऊत, पक्षी अभ्यासक, अर्जुनी-मोर.
या वर्षी पावसाळा लांबला आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबल्याने शेतीची कामेसुद्धा लांबली. पाहिजे त्या प्रमाणात  थंडी सुरू झाली नाही. आपल्या तालुक्यातील विविध पानवठ्यांवर अनेक प्रजातींचे पक्षी दाखल होतात. कदाचित या कारणांमुळेच स्थलांतरित पक्ष्याचे आगमन झाले नसावे. या वर्षी त्यांचा उशिरा मुक्कामसुद्धा वाढू शकतो.
- प्रा. डॉ. शरद मेश्राम, पक्षी अभ्यासक, अर्जुनी-मोर

दरवर्षी या पक्ष्यांचे होते आगमन
- तालुक्याच्या विविध पाणवठ्यांवर यंदा पिंटेल व ग्रे लग गुज या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केवळ या दोनच प्रजातींचे पक्षी सध्यातरी दिसून येत आहेत. यासोबतच दरवर्षी पिटलेस, कॉमन पोचार्ड, व्हाईट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलार्ड गार्गणी, कोंब डक, लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गणी, युरोप, आशिया, जपान व चीन देशात आढळणारे कॉमन टिल तसेच युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसॅड पायपर (छोटी तुतवार), युरेशियन कर्लू, लिटिल स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्नाईप, कोम्बडक (नाकेर) आदी प्रजातींचे पक्षी आपल्या परिसरात येतात. मात्र, त्यांचे आगमन अद्याप झालेले नाही.

 

Web Title: The arrival of foreign visitors was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.