खेलो इंडियातून घडताहेत उत्तम खेळाडू; ३० खेळाडूंवर कसून मेहनत सुरू
By नरेश रहिले | Published: August 28, 2023 06:15 PM2023-08-28T18:15:16+5:302023-08-28T18:18:57+5:30
गोंदियात होतेय हर्डल्स, बॉक्स जंप, हिल ट्रेनिंग
नरेश रहिले
गोंदिया : खेलो इंडिया ही देशातील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. विविध राज्यांतील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची पात्रता बाळगून आहेत. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी खेलो इंडिया सुरू करण्यात आला. १७ व २१ वर्षांखालील मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. उत्तम दर्जाचे आयोजन, स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यामुळे या स्पर्धेची एक वेगळी ओळख क्रीडाजगतात तयार होत आहे. गोंदियातील खेळाडू आपले नाव राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्याच्या शर्यतीत आहेत.
सन २०२१ मध्ये नोव्हेंबर महिन्यापासून जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व गोंदिया जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेनुसार जिल्हास्तरीय खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यात ॲथलेटिक्स या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सिलेक्शन ट्रायलमध्ये जिल्हाभरातून १५ मुले व १५ मुली अशा ३० प्रशिक्षणार्थ्यांची या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी निवड करण्यात आली. यासाठी मुख्य क्रीडा मार्गदर्शक (ॲथलेटिक्स कोच) जागृत सेलोकर हे या खेळाडूंना तयार करीत आहेत.
अंडर-१६ मध्ये दीप डोंगरे दुसरा
सन २०२२ ऑगस्ट महिन्यात नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य अंडर १६ ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत गोंदियातून ५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात दीप डोंगरे याने ५००० मीटर चालणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला. सन २०२२ नोव्हेंबरमध्ये झालेल्या पश्चिम विभाग ज्युनिअर अंडर १६ ॲथलेटिक्स स्पर्धा रायपूर, छतीसगडमध्ये त्याने सहभाग नोंदविला. मुंबईमध्ये आयोजित अंडर १८ व २० ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत २०२२ मध्ये खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र गोंदियाचे २ खेळाडू, मनीष रहांगडाले व ऋतिक मस्करे हे सहभागी होऊन फायनलपर्यंत पोहोचले होते.
१४ खेळाडूंनी मिळवले यश
खेलो इंडियाच्या गोंदिया प्रशिक्षणातून २०२२ ला आयोजित शालेय जिल्हा मैदानी स्पर्धेत १४ खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात मनीष रहांगडाले, ऋतिक मस्करे, आचल देशभ्रतार क्रॉसकंट्री, श्रृती चौधरी लांबउडी, बादल कटरे, मोहित चौधरी तिहेरी उडी, अस्मिता चौधरी, नीलेश कापसे, आदित्य इनकाने, पौर्णिमा उके, राहुल राऊत, संजय दहीकर, सोनल मौजे, रजनी मौजे या खेळाडूंनी क्रीडा प्रकारात प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते.
खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंना हर्डल्स, बॉक्स जंप, हिल ट्रेनिंग व डाएट प्लॅनची माहिती खेळाडूंना वेळोवेळी दिली जाते. पुढे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मैदानी स्पर्धा पुणे व डेरवन रत्नागिरी व शालेय मैदानी स्पर्धा २०२३-२४ साठी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राचे १० वर्ष ते २३ वर्ष वयोगटातील खेळाडू १०० मीटर धावणे, उंचउडी, तिहेरी उडी, ४०० मीटर रिले, हातोडा फेक, हर्डल्स, क्रॉस कंट्री इत्यादी तकनीकी खेळांचे प्रशिक्षण देणे सुरू आहे.
- जागृत सेलोकर, प्रशिक्षक खेलो इंडिया, गोंदिया.