Gondia: गोंदिया जिल्ह्यात 'ती'चा वाढतोय जन्मदर, वर्षभरात २३२६ मुलींनी घेतला जन्म
By कपिल केकत | Published: December 31, 2023 06:29 PM2023-12-31T18:29:07+5:302023-12-31T18:29:35+5:30
Gondia News:मुलगा तर वंशाचा दिवा व मुलगी म्हणजे नाहक टेन्शन ही धारणा बाळगून पूर्वी कन्या भृणहत्या केली जात होती. परिणामी मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर फारच कमी होता.
- कपिल केकत
गोंदिया - मुलगा तर वंशाचा दिवा व मुलगी म्हणजे नाहक टेन्शन ही धारणा बाळगून पूर्वी कन्या भृणहत्या केली जात होती. परिणामी मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर फारच कमी होता. मात्र बदलत्या काळानुसार लोकांच्या डोक्यात घर करून बसलेली ही धारणा आता बदलत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर आजही कमी असला तरी त्यातला फरक मात्र अत्यंत कमी झाला आहे. सन २०२३ मध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या फक्त १९७ एवढी कमी आहे. यामुळेच जिल्ह्यात आता ताईंचा जन्मदरही वाढू लागल्याचे दिसत आहे.
म्हातारपणी मुलगाच आपला सांभाळ करणार, अशी आई-वडिलांची अपेक्षा असते. मात्र मुलांकडूनच आपल्या आई-वडिलांना घराच्या बाहेर काढले जात असल्याचेही कित्येक उदाहरणे दैनंदिन जीवनात बघावयास मिळत आहेत. तर याउलट मुलीच मुलांची जागा घेऊन आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करताना दिसत आहेत. एवढेच काय तर त्यांना अखेरचा निरोपही मुलीच देत असल्याचेही बघावयास मिळत आहे. म्हणूनच काळानुसार लोकांच्या डोक्यात घर करून बसलेली जुनी धारणा आता संपुष्टात आली असून मुलगा असो वा मुलगी दोघे एकसमान हे सर्वांना उमगले आहे. यामुळेच आता मुलगा-मुलगीमधील फरक कमी होत चालला आहे. नगर परिषद कार्यालयातील नोंदणीनुसार सन २०२३ मध्ये २५२३ मुलांनी तर २३२६ मुलींनी जन्म घेतला आहे. म्हणजेच, मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्या फक्त १९७ एवढी कमी आहे. येत्या काळात हा फरक पूर्णपणे संपून ताईंची संख्या जास्त राहणार यात शंका नाही.
ग्रामीण भागात जनजागृतीची गरज
- मुला-मुलींमधला फरक आता कमी झाला असला, तरी ग्रामीण भागात मात्र आजही कित्येक कुटुंबात वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा आहे. अशा कुटुंबाच्या नजरेत मुलींना स्थान नाही व मुली जन्माला येऊ नये यासाठी ते कोणत्या तळाला जाऊ शकतात अशी स्थिती असते. नाही तर मुलाच्या नादात अपत्यांची संख्या वाढत जाते. परिणामी, जास्त मुले होऊन त्यांचा सांभाळ करणे कठीण जाते. अशात मुला-मुलींमधील फरक लोकांच्या डोक्यातून काढण्यासाठी ग्रामीण भागात आजही जनजागृतीची गरज आहे.
सन २०२३ मधील मुले-मुलींची जन्म संख्या
महिना- मुले- मुली
जानेवारी- २१९-१९७
फेब्रुवारी-२१३-१८५
मार्च- १७९-१६९
एप्रिल- २४४-२०२
मे- १५७-१८४
जून-१६५-१३९
जुलै-१९७-२०६
ऑगस्ट- १९३-१८७
सप्टेंबर-२३३-२२६
ऑक्टोबर-२५२-२०८
नोव्हेंबर-१९२-१६८
डिसेंबर- २७९-२५५.