बोकड चोरून नेणाऱ्यांना अखेर पकडले; रावणवाडी पोलिसांची कारवाई
By नरेश रहिले | Published: October 2, 2023 02:12 PM2023-10-02T14:12:46+5:302023-10-02T14:14:10+5:30
काही तासात आरोपी जाळ्यात
गोंदिया : रावणवाडी पोलिसांनी बोकड चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या काही तासात जेरबंद केले. बोकड चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५६ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरपार येथील मंगल बाबुलाल मस्करे यांनी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुमारास त्यांचा मालकीचा पांढऱ्या रंगाचा, काळे ठिपके असलेला बोकड व इतर शेळ्या चारत असताना तीन व्यक्तींनी एका मोटारसायकलवर एमएच ३५ एएस ७९०२ वरून रावणवाडी ते बालाघाट रस्त्यावरून ६ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा बोकड चोरी करून नेला. यासंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
रावणवाडी पोलिसांच्या पथकाने मोटारसायकल. एमएच ३५ एएस ७९०२ चा पोलिस ठाणे परिसरात शोध घेऊन शिरपूर येथे रात्री १०:५७ वाजता त्या तिघांना पकडले. त्या आरोपींजवळून मोटारसायकल एमएच ३५ एएस ७९०२ किंमत ५० हजार व बोकड किंमत ६ हजार असा एकूण ५६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश योगेश करोशिया (१९) रा. चांदणी चौक, स्टॉप जवळ काटी हल्ली मुक्काम डब्लिंग कॉलनी गोंदिया, शक्ती आनंद कुवर (१९) डब्लिंग ग्राउंड गौतमनगर गोंदिया व काली मंदिर जवळ सिव्हिल लाईन गोंदिया येथील एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभाग विभागीय अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन रावणवाडीचे ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस हवालदार रंजित बघेले, सुबोध बिसेन, पोलिस नायक मलेवार यांनी केली आहे. तपास पोलिस हवालदार अरविंद चौधरी करीत आहेत.