चहा विक्रेत्याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 05:00 AM2022-03-28T05:00:00+5:302022-03-28T05:00:26+5:30
२०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल २५ मार्च रोजी जाहीर झाला. ही परीक्षा प्रीतीने २१६ गुणांसह यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातून १७ क्रमांक पटकावला. यापूर्वी आमगाव तालुक्यातील कातुर्ली या खेडेगावातील मोसमी कटरे हिने गतवर्षी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर प्रीती ही पवार समाजातील दुसरी पोलीस महिला अधिकारी होणार असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्याचा बाऊ न करता कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवून जे आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात ते भविष्यात निश्चितच यशस्वी होतात. असाच काहीसा अनुभव गोंदिया येथील शेतकरी कुटुंबातील आणि चहा विक्रेत्याची मुलगी प्रीती सुरेश पटले हिने दिला. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण करीत प्रीतीने इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
प्रीती पटले या शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने सन २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत २१६ गुण प्राप्त करून ओबीसी प्रवर्गातून राज्यात १७ वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून प्रीतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रीती पटलेचे वडील सुरेश व आई गीता पटले अल्पभूधारक शेतकरी दांपत्य आहे. वडिलांचे शिक्षण सातवी तर आईचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
दीड एकर शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी शहराजवळच तिरोडा मार्गावर चहाचे दुकान लावले आहे. प्रीती लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार व जिद्दी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कुडवा येथे तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण गोंदिया येथे झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण तिने खासगी नोकरी करून पूर्ण केले.
यशवंतराव मुक्त विद्यापीठाची बीए पदवी तर राज्यशास्त्रात नागपूर विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. प्रशासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते.
यासाठी खासगी नोकरी सोडून तिने सन २०१७ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
अभ्यासादरम्यान सोशल मीडियापासून दूर राहा
- जिल्ह्यातील युवक-युवतींनी प्रशासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व संयमाने पुढे जावे. अभ्यासासाठी मोबाईल, इंटरनेट आवश्यक आहे. मात्र, अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहिले तर बरे. समाजात मुलगी वयात आल्यावर प्रत्येक आईवडिलांना मुलीच्या लग्नाची घाई होते. अशी घाई माझ्या आईवडिलांनाही होती. मात्र,माझे स्वप्न त्यांना सांगितल्यावर त्यांनी ते पूर्ण करण्यासाठी मला पाठींबा व प्रोत्साहन दिले. मुलींच्या स्वप्नांना आईवडिलांनी पाठबळ दिल्यास नक्कीच त्या प्रगतीच्या शिखरावर आपले नाव कोरल्याशिवाय राहणार नाहीत.
स्वत: अल्पशिक्षित असून मुलीच्या स्वप्नाला दिले बळ
- प्रीतीचे वडील सुरेश पटले यांचे शिक्षण सातवी तर आई गीताचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. सुरेश पटले हे स्वत: अल्पशिक्षित असून देखील त्यांनी कधीच मुलीच्या स्वप्नांच्या आड न येता तिला स्वातंत्र्य देत शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. तिच्या स्वप्नांना आई-वडिलांचे बळ मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
पाच वर्षांच्या परिश्रमाचे झाले चीज
प्रीतीच्या आईवडिलांना या परीक्षांबद्दल अधिक माहिती नव्हती. परंतु त्यांनी प्रितीला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे शिकवणी वर्ग वा मार्गदर्शन नसतानाही ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजनपूर्वक अभ्यास केला. २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल २५ मार्च रोजी जाहीर झाला. ही परीक्षा प्रीतीने २१६ गुणांसह यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातून १७ क्रमांक पटकावला. यापूर्वी आमगाव तालुक्यातील कातुर्ली या खेडेगावातील मोसमी कटरे हिने गतवर्षी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर प्रीती ही पवार समाजातील दुसरी पोलीस महिला अधिकारी होणार असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.