धानाला बोनसचा निर्णय जाहीर पण आता खात्यावर केव्हा होणार जमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:13 IST2025-04-14T18:12:56+5:302025-04-14T18:13:38+5:30
शेतकऱ्यांचा सवाल : दीड लाख शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा

The decision to give bonus to paddy crop has been announced, but now when will it be credited to the account?
विजेंद्र मेश्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
खातिया : राज्यातील महायुती सरकारने गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली. याचा जीआर सुद्धा पंधरा दिवसांपूर्वी निघाला. शासनाने लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा केली जाईल असे सांगितले होते. पण अद्यापही ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे बोनसची रक्कम बँक खात्यावर जमा केव्हा होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
शासन धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून बोनस जाहीर करते. पूर्वी बोनस हा प्रति क्विंटल मागे दिला जात होता. पण गेल्या तीन वर्षापासून शासनाने यात बदल करीत हेक्टरी बोनस देण्यास प्रारंभकेला. गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली तेच शेतकरी बोनससाठी पात्र ठरतील असा निकष शासनाने यासाठी लावला होता.
जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली होती. ते शेतकरी बोनससाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील बोनससाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. बोनसचे आदेश निघून पंधरा ते वीस दिवस लोटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली नसल्याने ही रक्कम बँक खात्यावर केव्हा जमा करणार? असा सवाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
आधी आदेशासाठी तर आता पैसे जमा होण्यासाठी प्रतीक्षा
महायुती सरकारने धानाला बोनसची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली. पण त्यासंदर्भातील आदेश निघण्यासाठी चार महिने लागल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. तर आता आदेश निघाले; पण बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
"बोनसच्या रकमेतून शेतकरी उधारउसनवारी व खरीप हंगामाचे नियोजन करीत असतात. त्यामुळे शासनाने बोनसची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिलासा द्यावा."
- डॉ. जगदीश पारधी, शेतकरी चिरामनटोला
"शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी उधार उसनवारी व कर्ज काढावे लागले. त्यामुळे बोनसची रक्कम लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना खरिपाची तयारी व उधार उसनवारी फेडण्यास मदत होईल."
- विजय रहांगडाले, सेवा सोसायटी अध्यक्ष अर्जुनी
"महायुती सरकारने बोनसची घोषणा केली; पण त्याचे आदेश काढण्यासाठी चार महिने लावले. आता बोनसची रक्कम जमा करण्यासाठी चार महिने लावू नये, लवकर रक्कम जमा करावी."
- देवानंद महारवाडे, शेतकरी खातिया