काँग्रेसच्या कार्यप्रणालीने व्यथित होऊन पक्ष सोडण्याचा निर्णय
By अंकुश गुंडावार | Updated: February 18, 2025 18:40 IST2025-02-18T18:00:00+5:302025-02-18T18:40:29+5:30
सहषराम कोरोटे : २१ फेब्रुवारीला करणार शिंदेसेनेत प्रवेश

The decision to leave the party after getting the Congress working system in order
गोंदिया : विधानसभा निवडणुकीदरम्यान ऐनवेळी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला अंधारात ठेवून माझे तिकीट कापून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करीत असताना, पक्षाने मला शेवटच्या क्षणापर्यंत अंधारात ठेवून माझा विश्वासाघात केला. यासर्व प्रकाराने मी प्रचंड व्यथीत झालो असून, काँग्रेस पक्षाला रामराम करीत शिंदेसेनेत २१ फेब्रुवारीला पक्ष प्रवेश करीत असल्याचे आमगाव विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आ. सहषराम कोरोटे यांनी मंगळवारी (दि. १८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे, सुगत चंद्रिकापुरे, शिंदेसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, सुरेंद्र नायडू उपस्थित होते. माजी आ. कोरोटे म्हणाले २१ फेब्रुवारी रोजी देवरी येथील क्रीडा मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्यासोबत शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून मी काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे काम केले. आमगाव विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटन बळकट केले. कार्यकर्त्यांची फळी
तयार केली, पण पक्षाने ऐनवेळी उमेदवारी डावलून माझ्यावर मोठा अन्याय केला. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यात शिंदेसेनेची ताकद वाढणार असल्याचे सांगितले. इतरही राजकीय पक्षांकडून पक्ष प्रवेशाची ऑफर होती, पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विकास कामांनी प्रेरीत होऊन मी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कोरोटे यांनी सांगितले.
पटोलेंच्या अतिआत्मविश्वासामुळेच पराभव
काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना स्थानिक स्तरावरची परिस्थिती न जाणून घेता स्वत:च्या अतिआत्मविश्वासाने नवख्या उमेदवारांना विरोध असताना सुद्धा उमेदवारी दिली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा आरोप माजी आ. कोरोटे यांनी केला.
पक्ष संघटन वाढीसाठी काम करणार - मनोहर चंद्रिकापुरे
शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मी पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार आहे. तसेच आपल्या राजकीय व प्रशासकीय अनुभवाचा यासाठी वापर करणार असल्याचे माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी सांगितले. तसेच माझे तिकीट का कापले ते मी नाही सांगणार तर ज्यांनी माझे तिकीट कापले तेच याचे उत्तर देऊ शकतील, असे ते म्हणाले.
आणखी एका माजी खासदाराचा प्रवेश होणार
होळीनंतर गोंदिया जिल्ह्यातील एक माजी खासदार आणि एक माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. तर येणाऱ्या काळात ही संख्या पुन्हा वाढू शकते, असे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी सांगितले.