डेंग्यूचा मच्छर पिच्छा काही सोडेना; दीड महिन्यात ३३ रुग्ण
By कपिल केकत | Published: November 23, 2023 07:04 PM2023-11-23T19:04:37+5:302023-11-23T19:04:39+5:30
पावसाळा संपूनही धोका मात्र कायमच, पावसाळ्यात सर्वाधिक आजार बळावत असून, पाण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्वच बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागते.
गोंदिया : पावसाळ्यात डासजन्य आजार जास्त फोफावतात, असे दिसून येत असले तरी आता पावसाळा संपला असूनही डेंग्यूचा धोका काही कमी झालेला दिसून येत नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील २१ तारखेपर्यंत म्हणजेच दीड महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३३ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. यावरून पावसाळा संपूनही डेंग्यूचा धोका काही कमी झालेला नसून, डेंग्यूचा मच्छर जिल्हावासीयांचा पिच्छा काही सोडेना, असे म्हणावे लागणार आहे.
पावसाळ्यात सर्वाधिक आजार बळावत असून, पाण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्वच बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागते. असे असतानाच जिल्हावासीयांची डासांपासून सुटका नसल्याने त्यांच्या विषारी डंकाचा सामना करावा लागतो. हेच कारण आहे की, जिल्ह्यात दरवर्षी मलेरिया व डेंग्यूचा शिरकाव होऊन तो चांगलाच फोफावतो. यंदाही जिल्ह्यात मलेरिया व डेंग्यूचा शिरकाव झाला. जिल्हावासीयांना त्यांचा सामना करावा लागला. ऑक्टोबरपासून पावसाने जिल्हा सोडला. त्यानंतर डासजन्य आजारांचा प्रकोप कमी होणार असे वाटत होते. मात्र, याउलट परिस्थिती असून, पावसाळा संपूनही डासजन्य आजारांचा धोका काही कमी झालेला नाही.
जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर या दीड महिन्यांच्या कालावधी डेंग्यूचे तब्बल ३३ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ऑक्टोबर महिन्यात २८ तर नोव्हेंबर महिन्यात २१ दिवसांत पाच रूग्ण आढळून आले आहेत. यावरून पावसाळा नसला तरी मच्छर काही पिच्छा सोडणार नाही हेच दिसून येते.
गोंदिया तालुक्यात जास्त धोका
यंदा डेेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यातच आढळून आले आहेत. आता ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातही हाच प्रकार कायम असल्याचे दिसले. कारण, ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात २८ रुग्ण आढळून आले असून, त्यात १० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. नोव्हेंबर महिन्यात पाच रुग्ण आढळून असून, सुदैवाने गोंदिया तालुक्यात एकही रुग्ण नाही.
सप्टेंबर महिन्यात केला कहर
यंदा मलेरिया व डेंग्यूचा सर्वाधिक कहर सप्टेंबर महिन्यात दिसून आला. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात डेंग्यूचे ७१ रुग्ण आढळून आले होते. यात गोंदिया शहरातील आठ, तर गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १५ रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. मात्र, पावसाळा संपूनही ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातच १० रुग्ण आढळल्याने धोका काही संपलेला नाही, असेच म्हणावे लागणार आहे.
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील रुग्ण तालुकानिहाय
तालुका -ऑक्टोबर- नोव्हेंबर
गोंदिया- १०-००
तिरोडा- ००-०१
आमगाव- ०४- ०२
गोरेगाव- ०४-००
देवरी-०१-००
सडक-अर्जुनी- ०६-०१
सालेकसा- ०३-००
अर्जुनी-मोरगाव-००-००
गोंदिया शहर- ००-०१
तिरोडा शहर- ००-००
डेंग्यू रुग्णांची महिनानिहाय आकडेवारी
महिना- रुग्ण
जानेवारी ते जुलै- २६
ऑगस्ट- ५३
सप्टेंबर- ७१
ऑक्टोबर- २८
२१ नोव्हेंबर- ०५