चिंगी जंगलात उपकरण सापडले
By अंकुश गुंडावार | Published: May 14, 2024 04:31 PM2024-05-14T16:31:46+5:302024-05-14T16:32:24+5:30
परिसरात खळबळ:हे उपकरण हवामान विभागाचे असल्याचा प्राथमिक निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध वनपरिक्षेत्रांतर्गत चिंगी बीट क्रमांक एक मधील कक्ष क्रमांक २१३ मध्ये शुक्रवारी (१०) एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आढळून आले. या उपकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे उपकरण हवामान खात्याचे असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आल्यानंतर जनतेच्या मनातली भीती दूर झाली आहे.
हवामानाचा अंदाज व वातावरणाचे निरीक्षण करणारे उपकरण हवामान विभागाद्वारे आकाशात सोडले जातात. वातावरणातील परिस्थितीचा अंदाज वर्तविण्याकरिता हे उपकरण सोडले जात असल्याचे समजते. यावरून हवामानाचा अंदाज निश्चित केला जातो. चिंगी बीटात वनरक्षक दुलिचंद सूर्यवंशी हे जंगलाची पाहणी करत असताना त्यांना अज्ञात वस्तू पडलेली दिसली. त्यांनी लगेच याची माहिती वन विभागाला दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. त्यांना हे उपकरण हवामान विभागाचे असल्याचे लक्षात आले. पंचक्रोशीत ही बातमी पसरतात एकच खळबळ माजली. वन विभागाने हे उपकरण आपल्या ताब्यात घेतले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वातावरणातील हवामानाचा अंदाज घेतला जातो. वातावरणाची परिस्थिती अशा उपकरणांद्वारे संकलित करून ती हवामान विभाग मार्फत लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी अवकाशात सोडलेले असले उपकरण हे महत्त्वाची भूमिका बजावतात. चिंगी येथे सापडलेल्या या उपकरणावर वेदर WxR 301D असे लिहिले असून हे हवामान खात्याशी संबंधित असल्याचे समजते.
उपकरण सापडले असल्याची खातरजमा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अवगान यांनी दिली. यासंदर्भात गुगलवर सर्च केले त्यात काही बातम्या मिळाल्या.महाराष्ट्रात सातारा व जम्मू काश्मीर च्या भागात सुद्धा अशी उपकरणे सापडल्याची बातमी आहे. जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.