भावी डॉक्टरने राज ठाकरे यांना लिहिले रक्ताने पत्र, केली ‘ही’ मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:26 PM2023-07-21T13:26:16+5:302023-07-21T13:30:53+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी : पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल
गोंदिया : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सर्वसामान्यांपासून नोकरदारही आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. राजकारणाचा स्तर किती खालावला, हे त्यांच्या भावनेतून किंबहुना चिंतेतून लक्षात येते. अशी भावना युवकांच्या मनात आहे. अशाच प्रकारची भावना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्दितीय वर्षात शिकणाऱ्या युवकाने थेट रक्ताने पत्र लिहून व्यक्त केली. हे पत्र त्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पाठविले असून त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या रक्ताने लिहिलेले त्या युवकाचे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे.
विशाल ढेबे असे या भावी डाॅक्टरचे नाव आहे. तो वडीकाळ्या (ता. अंबड, जि. जालना) येथील रहिवासी आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारसोबत अजित पवार गटाने हातमिळवणी केल्यानंतर राजकारणात चाललंय तरी काय? असा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला आणि यातूनच विशाल ढेबे या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्याने रक्ताने मनसेप्रमुख राज ठाकरेंना पत्र लिहिले.
सध्या महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली असून राजकारणी हे ज्वलंत प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहेत. स्वतःच्या हितासाठी राजकारण करत आहेत. एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू केले आहे. समृद्धी महामार्गावर एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा आपले लोकप्रतिनिधी हे शपथविधी घेतात. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न असून महिला सुरक्षित नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत, असे असूनसुद्धा 'शासन आपल्या दारी' या योजनेतून योजना सरकार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचे प्रश्न काय आहेत, हे सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपण या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी आणि महाराष्ट्राला एक वैभव लाभावे अशी भावना व्यक्त केली. सध्या हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.