गणरायाच्या मूर्तीलाही महागाईचा चटका, सर्वच वस्तूंचे दर वधारले

By कपिल केकत | Published: September 11, 2023 06:15 PM2023-09-11T18:15:00+5:302023-09-11T18:15:36+5:30

मूर्तिकार सहपरिवार कामात व्यस्त

The Ganesha idol of also hit by inflation, the prices of all goods increased | गणरायाच्या मूर्तीलाही महागाईचा चटका, सर्वच वस्तूंचे दर वधारले

गणरायाच्या मूर्तीलाही महागाईचा चटका, सर्वच वस्तूंचे दर वधारले

googlenewsNext

गोंदिया : येत्या १९ तारखेला गणरायाचे आगमन होत असून, लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र धावपळ सुरू झाली आहे. घराघरांमध्ये गणरायाच्या डेकोरेशनसाठी कुटुंबीय तयारी करीत आहेत. तर सार्वजनिक उत्सव मंडळांचे कार्यकर्तेही जय्यत तयारीला लागले आहेत. यात मूर्तिकारही मागे नसून आता काहीच दिवस उरले असल्याने ते आपल्या कुटुंबीयांसह मूर्तिकामात व्यस्त आहेत.

गणेशोत्सवाची गोंदिया शहराची जुनी परंपरा आहे. शहरातील गणेशोत्सवाची दूरवर ख्याती असून, गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. बहुतांश घरांत गणरायाची स्थापना केली जात असून शहरातील प्रत्येकच भागात सार्वजनिक मंडळांकडूनही गणरायाची स्थापना केली जाते. परिणामी अवघे शहर गणेशोत्सव काळात दूमदुमून निघते. येथील गणेशोत्सवाची ख्याती बघता जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतीलच नव्हे, तर लगतच्या राज्यांतील भाविकही गणेश दर्शनासाठी गोंदियात येतात.

१९ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ सजून निघाली आहे. गणरायाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात आले असून मूर्तींची सजावट करणाऱ्यांकडून खरेदी सुरू झाली आहे. यासह पूजेचे व देखाव्याचे सामान घेण्यासाठी बाजारात गर्दी वाढली आहे. सर्वत्र उत्सवाची धामधूम सुरू असतानाच मात्र महागाईने कुणालाही सोडलेले नाही. मूर्तीच्या मातीपासूनच तर सजावटीसाठी लागणारे साहित्य व पेंटचे दर अत्यधिक वधारल्याने गणरायाच्या मूर्तीलाही महागाईचा चटका बसला आहे.

प्रत्येकच साहित्याला महागाईची मार

- गणपतीची मूर्ती सजविण्यासाठी कापड, डायमंड, पेंट आदी साहित्य लागते. मात्र, या सर्वच साहित्यांचे दर यंदा चांगलेच वधारले आहे. परिणामी मूर्तिकारांनाही मूर्तीचे दर वाढवून मूर्ती विकावी लागणार आहे. यामुळेच यंदा सर्वसामान्यांना बाप्पाला घरी नेताना खिसा रिकामा करावा लागणार आहे.

५०० रुपयांपासून मूर्ती उपलब्ध

- येथील काही मूर्तिकारांकडून घरगुती मूर्ती तयार केल्या जातात. त्यांच्याकडे यंदा अर्ध्या फुटाची मूर्ती ५०० रुपयांपासून उपलब्ध आहे. तर पुढे उंची व त्यावर केलेल्या सजावटीनुसार त्यांचे दर वाढत चालले आहेत. महागाईमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती महागलेली आहे.

मूर्तिकार सहकुटुंब कामात व्यस्त

- गणरायाच्या आगमनाला आता जेमतेम सात दिवस उरले असून या काळात सर्वच मूर्ती तयार करून ठेवणे गरजेचे आहे. अशात मूर्तिकार आपल्या कुटुंबीयांसह रात्रंदिवस एक करून मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त दिसत आहे. कोरोना काळात दोन वर्षे मूर्तिकारांना चांगलाच फटका सहन करावा लागला. यंदा तरी काही उत्पन्न मिळावे, यादृष्टीने ते सहकुटुंब जास्तीत जास्त मूर्ती तयार करण्यासाठी धडपडत आहेत.

कार्यकर्ते वर्गणीला लागले

- शहरात मोठ्या संख्येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यातील काही मंडळ वर्गणी करीत नाहीत. तर लहान मंडळे वर्गणी करून उत्सव साजरा करतात. अशात मंडळांचे कार्यकर्ते सकाळपासूनच वर्गणीच्या कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.

असे आहेत साहित्यांचे दर
साहित्य- दर यंदाचे - दर मागील

वेलवेट कपडा- १५० - १२० (मीटर)
प्रिंट कपडा- २७०- १७० (मीटर)

डायमंड- ३७०- १८० (बारा नग)
गम- ६००-४०० (लिटर)

पेंट- ६००- ३८० (लिटर)
ट्रॅक्टर- ४०००- १५००

कोरोनामुळे दोन वर्षे चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. त्यात आता महागाईमुळे अडचण होत आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर वधारल्यामुळे आम्हालाही खरेदी करताना त्रास होत आहे. यामुळेच मूर्तींचे दर वाढवावे लागणार आहेत. जास्तीत जास्त मूर्ती तयार करण्यासाठी आता कुटुंबही साथ देत आहे.

- गोलू भरणे, मूर्तिकार

Web Title: The Ganesha idol of also hit by inflation, the prices of all goods increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.