मुख्याध्यापकांनी केले दोन शिक्षकांना कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 05:00 AM2022-07-08T05:00:00+5:302022-07-08T05:00:02+5:30
३० जून रोजी बोरगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत मागील ५ वर्षांपासून कार्यरत असलेले के. एस. खांडेवाहे (माध्यमिक शिक्षक) व एस. आर. ढेंगळे (प्राथमिक शिक्षक) यांना आश्रमशाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांनी प्रवेशोत्सव तयारीतील हलगर्जीपणामुळे कार्यमुक्त करीत असल्याचे पत्र देत तत्काळ कार्यमुक्त करून प्रकल्प कार्यालयात रुजू होण्यास सांगितले. त्यानुसार, प्रकल्प कार्यालयात रुजू होण्यास दोन्ही शिक्षक गेले असता त्यांना प्रकल्प कार्यालयातही रुजू करण्यात आले नाही.
विलास चाकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम बोरगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांना मुख्याध्यापकांनी कुठलीही अग्रीम नोटीस न देता त्यांना कार्यमुक्त केले आहे. तसेच दोघांना देवरी प्रकल्प कार्यालयात रूजू होण्यास सांगितले आहे. परंतु आठवडा लोटुनही प्रकल्प कार्यालयाने त्या दोन्ही शिक्षकांना रुजू करून घेतले नसल्याने त्या शिक्षकांवर भटकंतीची वेळ आली असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की, ३० जून रोजी बोरगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत मागील ५ वर्षांपासून कार्यरत असलेले के. एस. खांडेवाहे (माध्यमिक शिक्षक) व एस. आर. ढेंगळे (प्राथमिक शिक्षक) यांना आश्रमशाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांनी प्रवेशोत्सव तयारीतील हलगर्जीपणामुळे कार्यमुक्त करीत असल्याचे पत्र देत तत्काळ कार्यमुक्त करून प्रकल्प कार्यालयात रुजू होण्यास सांगितले. त्यानुसार, प्रकल्प कार्यालयात रुजू होण्यास दोन्ही शिक्षक गेले असता त्यांना प्रकल्प कार्यालयातही रुजू करण्यात आले नाही. उलट आपण एटीसी (नागपूर) कार्यालयात दाद मागावी म्हणत प्रकल्प कार्यालयाने हात झटकले.
विशेष म्हणजे, मुख्याध्यापक भाकरे यांनी प्रवेशोत्सवकरीता विद्यार्थी शाळेत आणण्याकरिता कोणताही प्रयत्न केलेला नाही. आपण प्रवेशोत्सवकरीता प्रत्येकी केवळ १ विद्यार्थी उपस्थित केला.
आपले मागील २ दिवसांपासून मी निरीक्षण करीत होतो. शिवाय शाळेच्या कार्यालयीन ग्रुपवर गावभेट दिल्याचेही दिसले नाही. यावरून आपण आदिवासी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाविषयी गंभीर नाही. प्रवेशोत्सव तयारीकरिता दिलेली जबाबदारी सुद्धा पार पाडलेली नाही. आपण कायम गेटवर बसलेले असल्याचे कारण दाखवून दोघा शिक्षकांना कार्यमुक्त केले. तसेच दोघा शिक्षकांमुळे शाळेचे वातावरण दूषित होत असल्याचे आरोप करीत प्रकल्प कार्यालयात पाठविण्यात येत असल्याचे पत्र त्यांना ३० जून रोजी दिले. परंतु प्रकल्प कार्यालयही त्या दोन्ही शिक्षकांवर अन्याय करीत असल्याचे चित्र असून तालुक्यातील शिक्षकात वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आक्रोशाची भावना निर्माण होत आहे.
माझी काहीच चूक नसूनही खोटे आरोप मुख्याध्यापकांनी माझ्यावर केले आहेत. सतत ते शनिवार-रविवार गैरहजर राहत असून माझ्यावर खोटे आरोप करीत आस्थापनेवरून कार्यमुक्त केले व प्रकल्प कार्यालयात रुजू होण्यास सांगितले. पंरतु प्रकल्प कार्यालयानेही समाविष्ट न करता अप्पर आयुक्त कार्यालय नागपूरला जाण्यास सांगितले आहे.
-एस. आर. ढेंगळे, प्राथमिक शिक्षक
मुख्याध्यापक मला व ढेंगळे सर यांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने हे करीत आहेत. ३० जून रोजी कार्यमुक्त केलेल्या कार्यवाहीत कोणतेही कारण नसताना कोणतेही कारणे दाखवा पत्र न देता सरळ आश्रमशाळेतील आस्थापनेवरून कार्यमुक्त करत प्रकल्प कार्यालयात हजर होण्यास सांगितले. पंरतु प्रकल्प कार्यालयानेही आम्हांला सामावून न घेता, कोणतेही कार्यालयीन पत्र न देता अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला.
-के. एस. खांडवाहे, माध्यमिक शिक्षक
दोन्ही शिक्षकांच्या येत असलेल्या सततच्या तक्रारींमुळे त्यांना बोरगाव आश्रमशाळेतून कार्यमुक्त करीत प्रकल्प कार्यालयात पाठविण्यात आले आहे.
-नरेंद्र भाकरे, मुख्याध्यापक
शासकीय माध्य. व उच्च माध्य. कन्या आश्रमशाळा, बोरगाव