हत्तीचा कळप परत जाईना, शेतकऱ्यांना चैन पडेना; खरीप हंगामाला मुकण्याची वेळ
By अंकुश गुंडावार | Published: July 20, 2023 06:09 PM2023-07-20T18:09:22+5:302023-07-20T18:11:28+5:30
शिवरामटोला, भरनोली येथील शेतपिकांचे नुकसान : वन विभागाने वाढविली गस्त
केशोरी (गोंदिया) : मागील आठ दिवसांपासून हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास या कळपाने उमरपायलीपासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या शिवरामटोला, भरनाेली, राजोली या परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घालून २० शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पऱ्ह्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. परिणामी शेतकऱ्यांना खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. हत्तीचा कळप या परिसरातून परत जात नसल्याने नुकसानीच्या चिंतेने शेतकऱ्यांना चैन पडत नसल्याचे चित्र आहे.
मागील पश्चिम बंगाल मधून २५ ते ३० हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले होते. दोन महिने या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. एका शेतकऱ्याचा बळी घेतला होता एका शेतकऱ्याला गंभीर जखमी केले होते. तर नागणडोह येथील २० ते २५ झोपड्या भूईसपाट केल्याने तेथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेऊन राहण्याची वेळ आली. त्यानंतर हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. मात्र आठ दिवसांपुर्वी हा कळप पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली येथे या कळपाने शेतशिवारात धुमाकूळ घालून धानाच्या पऱ्ह्यांचे नुकसान केले. त्यानंतर या कळपाने आपला मोर्चा उमरपायलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या शिवरामटोला,राजोली, भरनोली या गावाकडे वळविला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास शेतशिवारात धुमाकूळ घालूृन धानाच्या पऱ्हयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे रोवणीसाठी पऱ्हे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. खरीप हंगामाची कामे करायची की हत्तीच्या कळपासाठी जागरण अशी बिकट समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.
वन विभागाने वाढविली गस्त
हत्तीच्या कळपाने नुकसान केलेल्या धानाच्या पऱ्ह्यांची वनपरिक्षेधिकारी व्ही.बी.तेलंग, ए.आर.मेश्राम, वनरक्षक वाय. जी. परशुरामकर यांनी गुरुवारी (दि.२०) घटनास्थळी भेट पाहणी केली. तसेच पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. तसेच शिवरामटोला, राजोली, भरनोली या परिसरातील वन विभागाची गस्त वाढविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांवर हंगामाला मुकण्याची वेळ
हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घालून धानाच्या पऱ्ह्यांचे नुकसान केले. त्यामुळे रोवणीसाठी पऱ्हे आणायचे कुठून असा प्रश्न सखाराम कुंभरे, दानच कुंभरे, कृष्णा कुंभरे, भगवान वट्टी, ग्यानीराम नरेटी, मंसाराम नरेटी, नानू नरेटी, रतिराम गावळे, अतिराम नरेटी, तितराम होळी, पारबता कोटंगे, सुनील बुध्दे, देविदास कोरेटी, रामबत्ती गावळे या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे