घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळून खाक; दिवाळीच्या आनंदावर विरजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 11:29 AM2023-11-13T11:29:57+5:302023-11-13T11:30:36+5:30
दागिने, नगदी रुपये, अन्नधान्य जळाले
बोंडगावदेवी (गोंदिया) : दिव्याचा भडका होऊन घराला लागून घरातील जीवनावश्यक साहित्यासह संपूर्ण सामानाची राख रांगोळी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथे घडली. ही घटना शनिवारी (दि.११) सकाळी १० वाजता घडली. आगीत सुरेश दिघाेरे यांचे घर जळाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील सुरेश उरकुडा दिघोरे हे पत्नी, दोन मुले यांच्यासह झोपडीवजा घरात आनंदाने राहत हाेते. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मुले शहराच्या ठिकाणी कामाला जातात. दिवाळीच्या सणानिमित्त मुलांनी ५० हजार रुपये वडिलांच्या हाती दिले. आनंदानी दिवाळी साजरी करू, अशी त्या कुटुंबाची इच्छा होती. दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी घरात कुटुंबीयांनी तेलाचा दिवा लावला. दिव्याच्या ज्योतीने पेट घेतला अन् क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. यात जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, नगदी रुपये यासह साहित्याची राख झाली. दरम्यान, गावकऱ्यांनी मदतीला धावून येत आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, ताेपर्यंत बराच वेळ झाला होता. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने दिघोरे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
मुलांनी दिलेले ५० हजार रुपये आगीत स्वाहा
सुरेश दिघाेरे यांची मुले शहरात रोजगार करून कुटुंबाला हातभार लावतात. मुलांनी दोन दिवसांपूर्वीच वडिलांना दिवाळीसाठी ५० हजार रुपये दिले होते. मात्र, शनिवारी दिघोरे यांच्या घराला लागलेल्या आगीत ही रोख रक्कमसुद्धा जळाली. त्यामुळे दिघाेरे कुटुंबीयांवर संकट ओढवले आहे.
हवा मदतीचा हात
घराला लागलेल्या आगीत संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने दिघोरे कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. दिघोरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासन स्तरावरून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सामाजिक दानदात्यांनी सहानुभूती म्हणून मदतीसाठी पुढे यावे, असे सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी कळविले आहे.