लुटारूंच्या इरादा पक्का; पैशाचा वर्षाव होताच उपअभियंत्याला दिला धक्का
By नरेश रहिले | Published: October 15, 2023 04:08 PM2023-10-15T16:08:06+5:302023-10-15T16:08:23+5:30
याप्रकरणी उपअभियंत्याच्या तक्रारीरुन गोंदिया शहर पोलिसांनी शनिवारी (दि.१४) गुन्हा दाखल केला.
गोंदिया: एलआयसी प्रिमीयम, घरभाडे व इलेक्ट्रीक बिल भरण्यासाठी पत्नीला, वडीलांना पैसे मागितले वडीलांनी आणि पत्नीने पैसे पाठविले. परंतु ते पैसे उपअभियंत्याच्या खात्यात दिसतच नव्हते. कॅचे क्लिअर केल्यावर ते संपूर्ण ट्रान्सफर झालेले पैसे दिसू लागले. यात उपअभियंताच्या खात्यातून ८ लाख ४३ हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपअभियंत्याच्या तक्रारीरुन गोंदिया शहर पोलिसांनी शनिवारी (दि.१४) गुन्हा दाखल केला.
शहरातील गणेश नगरातील सुबोध चौकात राहणारे उपअभियंता पवन दिलीप फुंडे (३०) यांच्या आयसीआयसीआय व स्टेट बॅंक ऑफ इंडिया बँकेतून ते पैसे ट्रान्सफर केले. एलआयसी, घरभाडे व इलेक्ट्रीक बिल भरण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी पत्नीला फोन पे द्वारे मेसेज केला होता. परंतु वेळेत त्यांच्या पत्नीचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वडीलांना फोन करून एसबीआयच्या खात्यातून ४५ हजार रुपये पाठवायला सांगतिले. त्यांनी पैसे पाठवून फोन वर कळविले. परंतु पैसे आल्याचा कोणताही मॅसेज फुंडे यांना न आल्याने पुन्हा वडीलांना फोन करून पैसे आले नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी दुसऱ्या यु.पी.आय. वर पुन्हा पैसे पाठविले.
वडील पैसे पाठवत होते आणि पवन फुंडे मोबाईलवर वेळोवेळी बॅलन्स चेक करीत होते. पंरतु त्यांच्या मोबाईलमधील ॲप योग्यरित्या काम करीत नसल्याने त्यांना कोणतेच मॅसेज येत नव्हते. त्यांच्या पत्नीने पैसे पाठविल्याचा मॅसेज केला परंतु त्यांनी पैसे पाठविलेला मॅसेज दिसत नसल्याने पुन्हा पत्नीला मॅसेज करून पैसे मागविले. त्यांनी पुन्हा ५० हजार असे एक लाख रूपये पाठविले. पत्नीने, वडीलाने व मित्राने पाठविलेले पैसे असे ८ लाख ४३ हजार रुपये अज्ञात आरोपीने ऑनलाइन आपल्या खात्यात वळविले. तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर भादंविच्या कलम ४२० सहकलम ६६ डी माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत आहेत.
कोविड काळात मित्राला दिलेले पैसेही याचवेळी आले
उपअभियंता नागपूरला बैठकीला जात असताना त्यांच्या मित्राला त्यांना फोन आला. कोविड काळात त्यांना २ लाख ८० हजारापैकी २ लाख ३० हजार रूपये आपल्याला ट्रान्सफर केल्याने त्यांनी सांगितले. त्यांनी नागपूरला पोहचल्यावर पैसे भरण्यासाठी फोन सुरू केल्यावर त्यांच्या खात्यात १० रुपये दिसले. त्यावरून ॲपवर तपासले असता ४ लाख रुपये दुसऱ्याच्या खात्यात गेल्याचे दिसले.
व्हेरीफिकेशन कॉलमुळे बँक खाते ब्लॉक केले
२ ऑक्टोबर रोजी रात्री १०:५२ वाजता उपअभियंता यांना कॉल आला, परंतु त्यांनी तो न स्वीकारल्यामुळे पुन्हा १०.५३ वाजता कॉल आला. समोरील व्यक्तीने एस.बी.आय. मार्फत जनरेटेड कॉल आला आहे, आपल्या एस.बी.आय. खात्यामधून ४ लाख रुपये ट्रांझेक्शन झाले आहेत. त्याच्या व्हेरीफिकेशसाठी कॉल केला असल्याचे सांगितले. त्यावर फुंडे यांनी कोणतेच उत्तर दिले नाही व कॉल कट झाला. त्यानंतर संशयित हालचालीमुळे त्यांचे बँक खाते एस.बी.आय.ने ब्लॉक केले केल्याचे त्यांना मॅसेज आले.
कॅचे क्लिअर केले अन दिसू लागले मेसेज
उपअभियंता फुंडे यांनी आपली अडचण बँकेच्या मित्राला फोनवर सांगितली असता त्याने आयसीआयसीआयचा दुसरा तक्रार नोंदविणारा नंबर दिला. मोबाईलचा कॅचे क्लिअर करण्यास सांगितले. त्यांची कॅचे क्लिअर केल्यानंतर त्यांना मॅसेज दिसायला सुरुवात झाली. त्यांच्या खात्यावरून भरपूर ट्रॉजेक्शन झाल्याचे त्यांना आढळले.
असे ट्रान्सफर केले पैसे
आयसीआयसीआय. बँक बचत खात्यातून १ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा ४५ हजार, दुसऱ्यांदा ९८ हजार रूपये व २ ऑक्टोबर रोजी ४ लाख रुपये असे एकुण ५ लाख ४३ हजार रूपये तसेच एसबीआय बचत खात्यातून १ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा ५० हजार, दुसऱ्यांदा एक लाख, तिसऱ्यांदा ५० हजार व चवथ्यावेळी एक लाख असे एकुण ३ लाख या खात्यातून पळविले. दोन्ही खात्यातून ८ लाख ४३ हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.