शहरातील केरकचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:35 PM2024-08-02T16:35:22+5:302024-08-02T16:36:49+5:30

Gondia : जागा शोधण्यात नगर परिषद पुन्हा अपयशी

The issue of garbage in the city is on the rise again; The health of the city dwellers is at risk | शहरातील केरकचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात

The issue of garbage in the city is on the rise again; The health of the city dwellers is at risk

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
शहरातून दररोज ४० टन कचरा निघतो, पण या केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेकडे घनकचरा प्रकल्पाचा अभाव आहे. परिणामी जागा मिळेल तिथे टाक कचरा, अशीच स्थिती आहे. त्यातच आता नगर परिषदेने घनकचरा प्रकल्पासाठी छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीघाटाजवळ जागा निश्चित केली आहे. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून, शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


शहराची लोकसंख्या दीड लाखावर गेली असून, गेल्या आठ-दहा वर्षांत शहराचा चारही बाजूने विस्तार झाला आहे. शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेने २५० वर सफाई कामगार, ४० घंटागाड्या, ट्रॅक्टर, तसेच नगर परिषदेत स्वतंत्र सफाई विभाग कार्यरत आहे. शहरातून दररोज ४० टन कचरा संकलित होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी १०० वर्षे पूर्ण झालेल्या नगर परिषदेकडे अद्यापही घनकचरा प्रकल्पाची व्यवस्था नाही. त्यामुळे शहराबाहेर जागा मिळेल तिथे टाक कचरा, हेच धोरण अवलंबिले जात आहे. तर, घनकचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करताना अनेकदा अर्थकारण आडवे आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच हा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही. त्यातच आता नगर परिषदेने शहरालगत असलेल्या पांगोली नदीघाट परिसरात घनकचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. हा परिसर शहरालगत असून, यालाच लागून नागरी वसाहत आहे. शिवाय या भागात धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच या परिसरात हा प्रकल्प सुरु करण्यास शहरवासीयांकडून जोरदार विरोध केला जात आहे. शहरातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचा सूर आता उमटत आहे.


"मी दोन दिवसांपूर्वीच गोंदिया नगर परिषदेचा चार्ज घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती नाही. मी याबाबतची सविस्तर माहिती घेऊन सांगतो."
- संदीप चिद्रावार, नगर परिषद, मुख्याधिकारी.


घनकचरा प्रकल्पाची जागा कशी बदलली
नगर परिषदेने काही महिन्यांपूर्वी चुलोद परिसरातील जागा घनकचरा प्रकल्पासाठी निश्चित केली होती. या ठिकाणी हा प्रकल्प उभारणे जवळपास निश्चित सुद्धा झाला होता, मात्र यानंतर दोन महिन्यांतच नगर परिषदेला या प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


शहरात घाणीचे साम्राज्य कायम
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरातील जवळपास सर्वच भागांत रस्त्यालगत केरकचऱ्याचे ढिगारे पडलेले आढळतात. यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
 

Web Title: The issue of garbage in the city is on the rise again; The health of the city dwellers is at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.