जयंती कार्यक्रमातून ऊर्जा, प्रेरणा आणि नवचेतना मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 05:00 AM2022-02-10T05:00:00+5:302022-02-10T05:00:03+5:30
कार्यक्रमाची सुरुवात मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला मार्ल्यापण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, मनोहरभाई पटेल यांचे कार्य हे राजकारणापलीकडचे होते. त्यांनी सदैव समाजकारणालाच प्राधान्य दिले. मी अवघा १३ वर्षांचा असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे मी त्यांच्या कुशल मार्गदर्शनाला मुकलो हे माझे दुर्भाग्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षणमहर्षी मनाेहरभाई पटेल हे स्वत: अल्पशिक्षित असताना येणारी पिढी ही शिक्षित व्हावी यासाठी दोन्ही जिल्ह्यांत शिक्षण संस्थांची स्थापन करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडली. गोंदिया-भंडारा जिल्ह्याला आपली कर्मभूमी मानून शिक्षण, कृषी, सिंचन आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी कार्य केले. त्यांनी केलेली विविध कार्ये आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्यापासून ऊर्जा, प्रेरणा आणि नवचेतना मिळते, त्यासाठीच दरवर्षी या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
गोंदिया शिक्षणसंस्था व मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या वतीने मनोहरभाई पटेल यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवारी (दि. ९) नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बाेलत होते. याप्रसंगी आ. मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, राजू कारेमोरे, अभिजित वंजारी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, विलास श्रृंगारपवार, माजी खा. मधुकर कुकडे, खुशाल बोपचे, माजी आ. अनिल बावणकर, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, बंडू सावरबांधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, सुनील फुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला मार्ल्यापण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, मनोहरभाई पटेल यांचे कार्य हे राजकारणापलीकडचे होते. त्यांनी सदैव समाजकारणालाच प्राधान्य दिले. मी अवघा १३ वर्षांचा असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे मी त्यांच्या कुशल मार्गदर्शनाला मुकलो हे माझे दुर्भाग्य आहे. मात्र त्यांनी दाखविलेली दिशा आणि विचार आत्मसात करून या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची जबाबदारी आपली समजून पदावर असो नसो, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सदैव करीत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच हा जिल्हा आपला असल्याची भावना ठेवून कार्य केल्यास निश्चित जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे सांगितले. यावेळी मंचावर उपस्थित अन्य मान्यवरांनी मनाेहरभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार माजी आ. राजेंद्र जैन यांनी मानले.
हे विद्यार्थी सुवर्ण पदकाने गौरवान्वित
- त्रिशा महेश बिसेन, आस्था शिवप्रसाद राऊत, आयुष विनयकुमार डोंगरे, सुधांशू विलास गहाणे, महर्षी रघुवंशमनी गुप्ता, जितेश सूरजलाल कोसरकर, हितांशी रवींद्र गुप्ता, फिरदोश वकील शेख, शुभांशू माणिक आगरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा खा.प्रफुल्ल पटेल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भेल प्रकल्प तडीस न गेल्याचे दु:ख
- गोंदिया : भंडारा जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, औद्योगिकीकरणाला गती मिळावी, यासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे भेलचा प्रकल्प आणला. यामुळे दहा हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार होते, पण केंद्रातील भाजप सरकारमुळे हा प्रकल्प पूर्ण हाेऊ शकला नाही. हा प्रकल्प तडीस न गेल्याचे आपल्याला आजही दु:ख असल्याची ग्वाही खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली.