जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 05:00 AM2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:00:01+5:30
जुन्या उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने मोठ्या पुलावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून हा पूल पाडण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र अद्यापही त्याला यश आले नाही. जोपर्यंत पूल पाडले जात नाही, तोपर्यंत नवीन पुलाच्या बांधकामालाही सुरुवात होणार नाही. त्यातच पुलाखाली राहणाऱ्या कुुटुंबीयांनी आधी आमचे पुनर्वसन करा नंतरच पूल पाडा अशी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासन गोंधळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया -बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाल्याने वाहतुकीस धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब सर्वप्रथम लोकमतने उघकीस आणली होती. त्यानंतर हा पूल जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. आता तब्बल चार वर्षांनंतर जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नयना गुंडे २ मे रोजी काढले आहे.
जुन्या उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने मोठ्या पुलावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून हा पूल पाडण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र अद्यापही त्याला यश आले नाही.
जोपर्यंत पूल पाडले जात नाही, तोपर्यंत नवीन पुलाच्या बांधकामालाही सुरुवात होणार नाही. त्यातच पुलाखाली राहणाऱ्या कुुटुंबीयांनी आधी आमचे पुनर्वसन करा नंतरच पूल पाडा अशी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासन गोंधळले आहे.
चार वर्षांपासून अहवालाची दखलच नाही
- सन २०१८ मध्येच सार्वजनिक बांधकाम विभाग,उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चमूने जुन्या आणि नवीन उड्डाणपुलाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यात हा पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून त्यावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे २३ जुलै २०१८ रोजी सोपविला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाने या पुुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला.
२०१४ मध्ये रेल्वेने दिला होता इशारा
- गोंदिया -बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असून या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा इशारा रेल्वे विभागाने २०१४ मध्ये जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन दिला होता.
७० वर्षांनंतर पुलावरुन वाहतूक बंद
- गोंदिया बालाघाट मार्गावर १९५२ मध्ये उड्डाणपूल तयार करण्यात आला. या पुलामुळे रेल्वे ट्रॅकमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत झाली होती. तेव्हापासून आत्ता पर्यंत म्हणजे जवळ ७० वर्षे याच उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू होती.याच उड्डाणपुलावरुन तिरोडा, बालाघाट मार्गे येणारी लहान मोठी सर्वच वाहने येतात.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल जीर्ण
- रेल्वे ट्रॅकच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलाला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. हा भाग रेल्वे विभागाच्या क्षेत्रात असल्याने रेल्वेने या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केले. त्यात ट्रॅक वरून गेलेला उड्डाणपूल वाहतूक करण्यास योग्य नसून तो केव्हाही कोसळू शकतो. ही बाब ऑडिट नंतर पुढे आली. त्यामुळे रेल्वे विभागाने २१ जुलै २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन जुन्या उड्डाणपुलावरुन सुरू असलेली वाहतूक त्वरित बंद करावी असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले होते.
पुलाला पडले भगदाड
- गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला आता ७० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला आहे.या पुलाच्या रेल्वे ट्रॅक परिसरातील भागाला मोठे मोठे भगदाड पडले आहे. पुलाच्या खालची बाजू सुद्धा जीर्ण झाल्याने केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.