लेटलतीफ कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी अध्यक्षांनी लावली फटकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 05:00 AM2022-05-14T05:00:00+5:302022-05-14T05:00:15+5:30
कर्मचारी कार्यालयीन वेळेत वेळेवर येण्याऐवजी उशिरा येत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या निदर्शनास आल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शुक्रवारी (दि. १३) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच जिल्हा परिषद इमारतीमधील सर्वच कार्यालयात धडक देत संबंधित कार्यालयातील हजेरीपत्रकच आपल्या ताब्यात घेतल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेण्यासाठी अध्यक्षांनी बैठकसुध्दा आयोजित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पदभार स्वीकारताच जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून, दुसऱ्याच दिवशी त्यांनी कार्यालयातील सर्वच विभागांमध्ये धडक देत कर्मचाऱ्यांची उपस्थिती बघितली. विशेष म्हणजे, त्यांनी हजेरीपत्रकच ताब्यात घेतले व त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.
गेल्या पावणेदोन वर्षांपासून पदाधिकारी विहीन असलेल्या जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होते. प्रशासक हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले असले तरी त्यांचा पाहिजे तसा वचक कर्मचारी वर्गावर दिसून आला नाही. त्यामुळेच की काय कर्मचारी कार्यालयीन वेळेत वेळेवर येण्याऐवजी उशिरा येत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या निदर्शनास आल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शुक्रवारी (दि. १३) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच जिल्हा परिषद इमारतीमधील सर्वच कार्यालयात धडक देत संबंधित कार्यालयातील हजेरीपत्रकच आपल्या ताब्यात घेतल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेण्यासाठी अध्यक्षांनी बैठकसुध्दा आयोजित केली आहे. अध्यक्ष रहागंडाले यांच्या औचक निरीक्षणामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचारी वर्गात एक दहशत निर्माण झाली. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांवर किती वचक राहतो, याकडे लक्ष द्यावे लागेल.
फक्त ‘चार दिन की चांदनी’ नको
- यापूर्वीही जिल्हा परिषदेत कित्येक पदाधिकारी व अधिकारी आलेत व गेलेत. पदभार घेताच त्यांनी आपला रुबाब दाखविण्यासाठी अचानक कार्यालय गाठून कर्मचाऱ्यांची उपस्थिती बघणे आदी प्रयोग केलेत. यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांनाही ते कडक असावे, असे वाटायचे. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा तीच कार्यप्रणाली सुरू होते, असे आजवर दिसून येत आहे. अशात आता जिल्हा परिषदेचा कारभार तरुणाच्या हाती देण्यात आला असून, त्यांनी कामाची सुरुवात चांगली केली. मात्र, असाच उत्साह कायम असावा, फक्त चार दिन की चांदनी नको.