धनेगाव येथील कार्यक्रमातून घडले आदिवासी संस्कृतीचे दर्शन; उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 05:39 PM2022-11-10T17:39:29+5:302022-11-10T17:45:05+5:30
गोंडवाना दर्शन संपादक, सुन्हेरसिंह ताराम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन दिवसीय कार्यक्रम
धनेगांव (गोंदिया) : गोंडवाना दर्शन मासिक पत्रिकाचे संस्थापक संपादक तसेच आदिवासी भाषा विकास शोध संस्थानचे संस्थापक सुन्हेरसिंह ताराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रम ६ व ७ नोव्हेंबरला सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ कवी लेखिका उषाकिरण आत्राम (संयोजिका, आदिवासी भाषा विकास शोध संस्थान) यांनी केले होते. या दोनदिवसीय कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
दि. ६ नोव्हेंबरला गोंडी भाषेचे तज्ज्ञ शेरसिंह आचला (दमकसा, छत्तीसगड) यांच्या मार्गदर्शनात पेनकारणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात ढोल, मांदर, टीमकीसारख्या गोंडी वाद्यांसह, नृत्य, गीतकार यांच्या पथकाने विविध प्रकारच्या पेनपाटा (देवगीत) व नृत्यांचे प्रस्तुतीकरण केले. पेनकारण हा एक विशिष्ट प्रकारचा पारंपरिक विधी आहे. ज्यात मृत व्यक्तीचे व त्याच्या कुटुंबाच्या इतिहासाचे गीताद्वारे स्मरण केले जाते. तसेच, नृत्य व पारंपरिक वाद्यांच्या सोबतीने मृत आत्म्याला आता तुम्ही देव झालात, तुमची आम्ही अशीच आठवण व पूजा करू, तुम्ही आमच्यात सदैव असाल अशी प्रार्थना केली जाते. आदिवासी समुदायामध्ये मृत्यू ही एक प्राकृतिक प्रक्रिया असून ती निसर्गात विलिन झाली या भावनेसह पेनकारण हा विधी करून त्यांचे स्मरण केले जाते.
काव्य वाचन व चर्चासत्र
दि. ७ ला साहित्य सरिता हा वैचारिक चर्चा व काव्य वाचनाच्या कार्यक्रम साहित्य संस्कृति मंडळाचे माजी सदस्य लखनसिंह कटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यात विचारवंत प्रकाश सलामे, राहुल कन्नाके यांच्यासह कवी युवराज गंगाराम, बापू इलमकर, शशी तिवारी, मानिक गेडाम, नंदू वानखेडे, मनोज बोरकर, निखीलेश यादव, मिलिंद रंगारी, मालती किन्नाके, नंदकिशोर नैताम, शिला जोसेफ, हेमलता आहाके, नत्थू उइके यासह अनेक कवींनी भावपूर्ण, वैचारिक, सामाजिक आशयाच्या कविता आणि नवोदितांना प्रेरणा देणाऱ्या कविता प्रस्तुत केल्या. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे संचालन बिच्चू वड्डे व प्रा. इंद्रा बोपचे यांनी केले तर आभार, शताली शेडमाके व नंदकिशोर नैताम यांनी मानले.