अनेकांपुढे उभा ठाकलाय प्रश्न; कार्यालयांतील तक्रारपेट्या झाल्या बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:31 PM2024-11-05T16:31:28+5:302024-11-05T16:32:43+5:30

प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष: नागरिकांनी तक्रार करायची कुठे?,

The question that stands before many is Grievance boxes in offices have gone missing | अनेकांपुढे उभा ठाकलाय प्रश्न; कार्यालयांतील तक्रारपेट्या झाल्या बेपत्ता

The question that stands before many is Grievance boxes in offices have gone missing

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
शहरासह तालुक्यातील शासकीय, कार्यालयातील निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी असतात. या तक्रारी वरिष्ठांसमोर जाण्यासाठी संबंधित विभागाच्या वतीने प्रशासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. शासकीय कार्यालयातून अशा प्रकारच्या तक्रारपेट्याच गायब झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची कुठे, असा प्रश्न पडला आहे. यामुळे तक्रारदार तक्रारपेट्यांच्या शोधात असल्याचे दिसत आहे.


विविध कार्यालयांत रोज अनेक ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामानिमित्त जात असतात. यावेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी नागरिक आपली तक्रार त्या पेटीत टाकून संबंधितांकडे आपले गाऱ्हाणे मांडायचे. मात्र, आता त्या तक्रारपेट्याच गायब झाल्याने तक्रार करायची कशी, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये दररोज विविध माध्यमांतून नागरिकांची लुबाडणूक होते. नियम, कायदे, अटी, कामाचे ओझे आदी कारणे पुढे करून अधिकारी व कर्मचारी नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे देतात. या कारभारामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. नागरिक तक्रार करण्यासाठी संबंधित कार्यालयात गेल्यावर तेथे अधिकारी उपलब्ध होत नाहीत. इतर कर्मचारी तक्रार स्वीकारण्यास तयार नसतात. तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न वारंवार नागरिकांना पडतो. तसेच, बऱ्याच वेळा गंभीर प्रकाराची तक्रार करण्यासाठी गेल्यावर संबंधित अधिकारी त्या तक्रारदारावर दबाव आणून तक्रार करू देत नाहीत. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न पडत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक असणे ही गरजेची बाब आहे. 


आधी असायची तक्रारपेटी 
विविध शासकीय कार्यालयांत तक्रारपेटी उपलब्ध असायची. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार करणे सोपे व अधिकारी याबाबत सावध असायचे. परंतु, आता तक्रारपेटी उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय सूचनांना बगल देऊन प्रशासकीय कामकाज जोरात सुरू असल्याचे विविध कार्यालयांत भासविले जात आहे.


कर्मचाऱ्यांना रान मोकळे 
शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या नसल्याने संबंधित विभागातील कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. तसेच, नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा विविध कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागतात. नागरिकांचे प्रश्न सुटावे, त्यावर विहित वेळेत तोडगा निघावा, तक्रार झाली तर कामकाजात सुधारणा व्हावी, याकरिता तक्रारपेठ्या लावणे आवश्यक आहे.


गोपनीय तक्रार करणाऱ्यांना अडचण
काही वर्षांपूर्वी शासनाने प्रत्येक शासकीय, निमशा- सकीय कार्यालयात तक्रारपेठ्या लावण्याविषयी निर्णय घेतला होता. प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्या- करिता शासकीय कार्यालयात तक्रारपेठ्या असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे गोपनीय तक्रार करण्यास नागरिकांना अडचण येत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, एखाद्या भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यां- बाबत तक्रार करायची झाल्यास नेमकी कुठे करायची?, त्यासाठीचे पत्र कुठे द्यायचे? याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांचा संभ्रम अजूनही कायम आहे.

Web Title: The question that stands before many is Grievance boxes in offices have gone missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.