दरोडेखोरांनी केला सात लाखांचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 05:00 AM2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:15+5:30
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल तसेच बेडरूममधील लाकडी आलमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा ३ लाख ८४ हजार रुपयांचा माल चोरून नेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत दोन घरफोड्या व एका ठिकाणी दरोडा घालून सात लाख सात हजार रुपयांचा माल पळवून नेला आहे. लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून नेली. या कृत्यात सात आरोपींचा समावेश आहे.
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल तसेच बेडरूममधील लाकडी आलमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा ३ लाख ८४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. तेथीलच पुष्पकला पुरषोत्तम बोरकर (५६) यांच्या घरासमोरील दाराचे कुलूप तोडून दोन लाख १४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. त्यांच्या घरासमोरील धनराज शंकर डहारे (३८) यांच्या घरासमोरील दाराचे इंटरलॉक तोडून एक लाख आठ हजार ५०० रुपयांचा माल असा एकूण सात लाख सात हजार रुपयांचा माल चोरून नेला. यासंदर्भात सातजणांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३९५, ४५७, ३८०, ४२७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगळे करीत आहेत.
नागपूरवरून परतताच सातजणांनी लुटले
- सोमवारी रात्री १२.३० वाजतादरम्यान मनीष गुप्ता हे परिवारासह नागपूर येथून घरी परतले असता, दोनजण हातात रॉड घेऊन त्यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये दिसले. गुप्ता यांनी कोण आहात, असे विचारल्यावर त्याचवेळी त्यांच्या घरातून आणखी पाचजण बाहेर आले. त्या सातजणांनी लोखंडी रॉडने त्यांच्या गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. तसेच गाडीत बसलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.
डुग्गीपार पोलीस सुस्त; चोर चुस्त...
- सडक-अर्जुनी शहरात डुग्गीपार पोलिसांची गस्त होत नसल्याने याचा फायदा दरोडेखोरांनी घेतला. डुग्गीपार पोलीस सुस्त असल्याने दरोडेखोरांनी एकाच रात्री सात लाखांहून अधिक रुपयांची मालमत्ता लुटून नेली. कुणी कॉल केला, तरी पोलीस ठाण्याचा क्रमांक कुणी उचलत नाही. ठाणेदारांना, वरिष्ठांना खूश करण्यासाठीच वेळ कमी पडतो, यात गस्त कोण घालणार? असा सवाल नागरिक करीत आहे. सडक-अर्जुनी येथे झालेल्या एका रात्रीत तीन चोरीच्या घटनांमुळे नागरिक धास्तावलेले असून, ठाणेदारांची बदली करण्याची मागणी होत आहे.