शिक्षकाच्या मागणीला घेवून संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप
By अंकुश गुंडावार | Published: August 9, 2023 04:14 PM2023-08-09T16:14:39+5:302023-08-09T16:15:07+5:30
शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : शिक्षक मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही
मोहाडी-चोपा : गोरेगाव तालुक्यातील चोपा येथील जि.प.शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी वांरवार करुनही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी (दि.९) शाळेला कुलूप ठोकले. तसेच जोपर्यंत शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशी भुमिका पालकांनी घेतली आहे.
चोपा येथील जि.प.प्राथमिक शाळेत सत्र २०२३-२४ मध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ६१ आहे. या पटसंख्येवर ३ शिक्षक मंजूर आहे. मागील सत्राच्या संचमान्यतेनुसार २ शिक्षक पात्र आहेत, असा अहवाल देवून गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी येथील एका शिक्षकाची तात्पुरती नेमणूक निंबा येथील शाळेत केली. यामुळे पालकांनी रोष व्यक्त करुन २५ जुलै रोजी पालक सभा घेवून आमच्या शाळेचा शिक्षक आम्हाला परत करा असा ठराव घेतला. तसेच दूरध्वनीवरुन पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विचारणा केली.
पदाधिकाऱ्यांनी १० दिवसात शिक्षकाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सांगण्यावरुन पालकांनी १० दिवस कोणतीही कार्यालयीन टपाल देण्यात येणार नाही असा निर्णय घेत त्यासंबंधिचे पत्र गटशिक्षणाधिकारी व सभापती यांना दिले. पण शिक्षण विभाग व पंचायत समितीने दिलेल्या आश्वासनाची पुर्तत: न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या चोपा येथील पालकांनी बुधवारी सकाळी एकत्र येत शाळेला कुलूप ठोकले. तसेच जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येत नाही तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही अशी भुमिका घेतली आहे.
पालक सभा घेवून ठोकले कुलूप
गटशिक्षणाधिकारी व पं.स.सभापती यांनी दहा दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. पण याला दिवसाचा दहा दिवसाचा लोटूनही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पालकांनी बुधवारी पालक सभा घेवून जोपर्यंत चोपा शाळेत शिक्षक नियुक्त करण्यात येत नाही तोपर्यंत शाळेला कुलूपबंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळेला कुलूप ठोकले.
जोपर्यंत आमच्या गावातील शाळेतून प्रतिनियुक्तीवरुन पाठविलेल्या शिक्षकाला परत चोपा शाळेत नियुक्त करण्यात येत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार नाही.
- समस्त पालक चोपा