मुलाने मद्यपी बापाला बुक्की मारून संपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:15 PM2024-10-01T16:15:28+5:302024-10-01T16:16:46+5:30

खैरबोडी येथील घटना : दारूचे व्यसन जीवावर बेतले

The son killed his drunkard father | मुलाने मद्यपी बापाला बुक्की मारून संपविले

The son killed his drunkard father

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
दारुड्या बापासोबत झालेल्या झटापटीत हातातील कडा डोक्यावर लागून बापाचा जागीच जीव गेला. तिरोडा तालुक्यातील ग्राम खैरबोडी येथे रविवारी (दि.२९) पहाटे १.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. रमेश पारधी (५०, रा. खैरबोडी) असे मृताचे नाव आहे.


खैरबोडी येथील रमेश पारधी हा पत्नी चंद्रकला पारधी (४७), थोरला मुलगा आनंद पारधी (२४) व धाकडा मुलगा अंकुश पारधी (२२) यांच्यासोबत राहत होता. रमेश पारधी दारूचा व्यसनी होता व नेहमी पत्नी चंद्रकला व थोरला मुलगा आनंद यांच्यासोबत भांडण करून त्यांना मारहाण करीत होता. अनेकदा दारूच्या नशेत तुम्ही माझ्या घरातून निघून जा, असे रमेश बोलत होता. शनिवारी (दि.२८) दुपारी चंद्रकला हिच्याशी भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली. तेव्हा आनंद कामानिमित्त बाहेर गेला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रमेश दारू पिऊन घरी आला. तेव्हा घरात अंकुश एकटाच होता. रमेशने त्याला त्याची आई कुठे गेली असे विचारून शिवीगाळ केली व पुन्हा घरातून बाहेर गेला. त्यानंतर रात्री ११.३० वाजता रमेश पुन्हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने पुन्हा अंकुश सोबत भांडण केले. 


दरम्यान, थोड्या वेळानंतर आनंद घरी आला असता रमेशने त्याच्यासोबतही भांडण सुरू केले. रविवारी (दि.२९) पहाटे १.३० वाजतापर्यंत दोघांचे आपसात भांडण सुरू होते. यात रमेशने आनंद याला 'तुझी आई घरातून निघून गेली. तुम्ही तिला कुठेतरी लपवून ठेवले' असे बोलून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावर आनंदने सुद्धा रमेशला शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. याच झटापटीत त्याच्या हातात असलेला धातूचा कडा रमेशच्या डोक्यावर लागल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्यातून व नाकातून रक्तस्त्राव होत असताना अंकुश याने त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पाणी पित नव्हता व बोलतही नव्हता व त्याचा मृत्यू झाला होता. यावर चंद्रकलाने गावातील नागरिक व नातेवाइकांना फोन करून या घटनेबद्दल सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय कवडे करीत आहेत. 


रात्रीच केली आनंदला अटक 
चंद्रकला हिने गावातील नागरिक व नाते- वाइकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लोकांनी पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. तसेच रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपी आनंद पारधी याला अटक केली. त्याला सोमवारी (दि.३०) न्यायालयात हजर करण्यात आले.
 

Web Title: The son killed his drunkard father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.