पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली; मुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून जन्मदात्याला संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 02:41 PM2022-10-29T14:41:04+5:302022-10-29T17:36:49+5:30
वडिलाची होती नेहमीची कटकट : आरोपीला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत मोकाशीटोला-रेंगेपार येथील मृतक मोतीराम टांगसू कुंभरे (६०) याने घरगुती वादातून आपल्या पत्नीच्या कानशिलात लगावली. हे कृत्य पाहावल्या न गेलेल्या मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून वडिलाचा खून केला. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता घडली.
आरोपी नरेंद्र मोतीराम कुंभरे (३७, रा. मोकासीटोला/ रेंगेपार) असे आरोपीचे नाव आहे. मृतक मोतीराम कुंभरे हा क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून कटकट करायचा. याचा आरोपीला त्रास व्हायचा. २६ ऑक्टोबर रोजी घरगुती कारणातून वाद केला. मोतीरामने आपल्या पत्नीला एक थापड मारल्याने या वयात हात उचलायचे असते का, असे बोलून आरोपीने कुऱ्हाडीने मारून त्याचा खून केला. डुग्गीपार पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास ठाणेदार सचिन वांगडे करीत आहेत.