आदिवासी विकास महामंडळाच्या उघड्यावरील धानाला फुटले कोंब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:31 PM2024-05-11T17:31:52+5:302024-05-11T17:32:21+5:30
संस्थाचालक संकटात : दरवर्षी नुकसान तरी शासन धडा घेईना; सहा महिन्यांपासून धान जागेवरच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासन आणि राइस मिलर्स यांच्यातील तिढा गेल्या सहा महिन्यांपासून कायम आहे. यावर तोडगा न निघाल्याने आदिवासी विकास महामंडळाने खरीप हंगामात खरेदी केलेला १५ लाख क्विंटल धान तसाच केंद्रावर उघड्यावर पडला आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने या धानाला कोंब फुटले असून, तो मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या या धानाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. पण, गेल्या सहा महिन्यांपासून राइस मिलर्सच्या मागण्या प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील राइस मिलर्सनी भरडाईसाठी धानाची उचल केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान पडून आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताडपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने अनेक केंद्रांवरील धानाला कोंब फुटत असून, धान खराब होत आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावांतील शेतकऱ्यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी केली आहे. मात्र, राइस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने धानाला कोंब फुटले असून, तो सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी नुकसान, पण महामंडळ दखल घेईना
आदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताडपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. तर आता अवकाळी पावसामुळे हे धान भिजत असल्याने दरवर्षी हजारो क्विंटल धान फेकण्यात जातो. हा दरवर्षीचाच प्रकार आहे. दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होऊनदेखील शासन तसेच महामंडळ दखल घेत नाही.
६ हजार क्विंटल धानाला फुटले अंकुर
सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावांतील शेत- कऱ्यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी केली. मात्र, राइस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने जवळपास ६ हजार क्विंटल धानाला अंकुर फुटले आहे.
चूक शासनाची, खापर संस्थांवर
आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान साठवून ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी खरेदी केलेला धान हा ताडपत्र्यांनी झाकून उघड्यावर पडला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे या धानाचे नुकसान झाले असून, संबंधित विभाग याचे खापर धान खरेदी करणाऱ्या संस्थांवर फोडत असल्याने या संस्थादेखील संकटात आल्या आहे.