'त्या' भरकटलेल्या वाघिणीचा मुक्काम मध्य प्रदेशातील किरणापूर जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 02:54 PM2023-07-22T14:54:49+5:302023-07-22T14:55:08+5:30
महिनाभरापासून मुक्काम : वन विभागाची चमू मागावर
गोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २० मे रोजी सोडलेल्या दोन वाघिणींपैकी एक वाघीण या प्रकल्पातून भरकटली होती. तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या वाघिणीला परत या व्याघ्र प्रकल्पात परतावून लावण्यात वन व वन्यजीव विभागाच्या चमूला यश आले नाही. आता या वाघिणीने आपला मोर्चा मध्य प्रदेशाकडे वळवित तेथील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर जंगलात मागील महिनाभरापासून ठाण मांडल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील एक वाघीण गेल्या एक महिन्यापासून गोंदिया जिल्ह्याशेजारील मध्य प्रदेशच्या बालाघाटच्या जंगलात फिरत आहे. किरणापूर वन परिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून या वाघिणीचे स्थान मिळाल्यानंतर २० जुलै रोजी दुपारी किरणापूर येथील पवार भवनजवळील टीव्हीएस एजन्सीच्या मागे असलेल्या शेतात शेतकऱ्यांना या वाघिणीच्या पायाचे ठसे उमटलेले आढळले. त्यावर शेतमालक सेवकराम पटले यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन याबाबतची माहिती दिली. त्यामुळे या वाघिणीचा मुक्काम किरणापूर परिसरातच असल्याला दुजोरा मिळाला आहे.
२० मे रोजी नवेगाव-नागझिरा अभयारण्य वनपरिक्षेत्रात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना सोडण्यात आले. त्यापैकी एक वाघीण गोरेगाव वनपरिक्षेत्रात फिरत होती. यानंतर गोंदिया तालुक्यातील पांगळी जंगलातून छिपियापासून काही अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील कडकाना जंगलात वाघिणीचे दर्शन झाले. तेव्हापासून ही वाघीण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातच फिरत आहे. वन विभागाच्या १५ ते २० सदस्यांची ४ पथके या वाघिणीच्या मागावर आहेत.
किरणापूर परिसरात दहशत
मागील १५ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनपरिक्षेत्राचे पथक कॉलर आयडीद्वारे वाघिणीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे गट तयार करून वाघिणीचे ठिकाण शोधत आहेत. जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर आलेल्या या वाघिणीचे वय सुमारे ५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. किरणापूर वनपरिक्षेत्रातील सीतापार गावात वाघिणीने एका गुराची शिकार केली. वाघीण गुरांची शिकार केल्यानंतर रक्त पितात, नंतर त्यांचे अन्न सुरक्षित ठिकाणी लपवतात आणि पुन्हा परत जातात आणि ती केलेली शिकार खातात.
वाघीण हिंसक झाली नाही
किरणापूर वनपरिक्षेत्र अधिकारी जगतदास खरे यांनी सांगितले की, तिला पकडले जाऊ शकते; परंतु अद्याप ती हिंसक झालेली नाही. तिला या जंगलात खायला शिकार मिळत आहे. एकदा खायला मिळालं की ती आठ-दहा दिवस न खाताही राहू शकते. महाराष्ट्र राज्याच्या वनपरिक्षेत्रातील पथके लोकेशनद्वारे सातत्याने निरीक्षण करीत आहेत. सुदैवाने किरणापूर वनपरिक्षेत्रात या वाघिणीने अद्यापपर्यंत कोणताही उपद्रव केलेला नाही.