शिक्षक बाहेरगावी अन् चोरटे झाले हावी, अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास
By कपिल केकत | Published: August 5, 2023 04:46 PM2023-08-05T16:46:41+5:302023-08-05T16:46:51+5:30
बंद घराचे कुलूप तोडले
गोंदिया : घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी शिक्षकाच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून दागिने व रोख असा एकूण दोन लाख २४ हजार ६५० रुपयांचा ऐवज लंपास केला. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत देवरी मार्गावरील बाबुजी पेट्रोलपंप समोर ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान रात्री ही घटना घडली आहे.
फिर्यादी शिक्षक राजेश गुलाबसिंग टेकाम (३८, रा. आमगाव) हे देवरी मार्गावरील बाबुजी पेट्रोल पंपसमोर राहत असून ते बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच बेडरूममध्ये ठेवलेल्या आलमारीचे लॉकर तोड़ून त्यातून ४६ हजार रुपये किमतीचे २३ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचा १० ग्राम वजनाचा लहान हार, १६ हजार रुपये किमतीचे आठ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २६ हजार रुपये किमतीचे १३ ग्राम वजनाचे सोन्याचे लहान नेकलेस, २० हजार रुपये किमतीची १० ग्राम वजनाची सोन्याची चेन, ३० हजार रुपये किमतीच्या १५ ग्राम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सहा हजार रुपये किमतीची १५ ग्राम वजनाची सोन्याची नथ, २२ हजार रुपये किमतीचे ११ ग्राम वजनाचे सोन्याचे कानाचे झुमके, १५०० रुपये किमतीच्या १९ ग्राम वजनाच्या चांदीच्या पायल, १२०० रुपये किमतीच्या १५ ग्राम वजनाच्या चांदीच्या पायल, ६०० रुपये किमतीच्या ५ ग्राम वजनाच्या चांदीच्या पायल, १५० रुपये किमतीचे २ ग्राम वजनाचे चांदीचे सिक्के, २०० रुपये किमतीच्या ३ ग्राम वजनाच्या चांदीच्या बिछिया व ३५ हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख २४ हजार ६५० रुपयांचा ऐवज लंपास केला. आमगाव पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोंद केला असून, तपास सपोनि गणपत धायगुडे करीत आहेत.