कमळासह घड्याळाची टिक टिक अन् चाबीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 05:00 AM2022-05-11T05:00:00+5:302022-05-11T05:00:02+5:30

अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय होऊ शकले नाही. त्यानंतर सोमवारी रात्री सत्तेचे नवीन समीकरण तयार झाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्य एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४०वर पोहोचले. त्यामुळे भाजपला या सर्वांना घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. 

The ticking of the clock along with the lotus | कमळासह घड्याळाची टिक टिक अन् चाबीही

कमळासह घड्याळाची टिक टिक अन् चाबीही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि.१०) निवडणूक घेण्यात आली. यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत वेळेवर नवीन समीकरण तयार केले. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर यांची निवड करण्यात आली. यामुळे काँग्रेसला विरोधात बसण्याची वेळ आली आहे. 
मागील तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर गेली होती. जि. प. सदस्य या विरोधात न्यायालयात गेल्यानंतर शासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. एकूण ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४ आणि अपक्ष २ असे चित्र होते. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष सदस्यांची साथ हवी होती. दरम्यान, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन मागील पंधरा दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी झाल्या. तर अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय होऊ शकले नाही. त्यानंतर सोमवारी रात्री सत्तेचे नवीन समीकरण तयार झाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्य एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४०वर पोहोचले. त्यामुळे भाजपला या सर्वांना घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. 
मंगळवारी सकाळी ११ वाजता भाजपकडून अध्यक्षपदासाठी पंकज रहांगडाले, तर काँग्रेसकडून उषा मेंढे यांनी नामांकन दाखल केले. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशवंत गणवीर, तर काँग्रेसकडून जितेंद्र कटरे यांनी निवडणूक पीठासीन अधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्याकडे अर्ज दाखल केले. त्यानंतर दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद सभागृहात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. हात उंचावून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले यांना ४०, तर काँग्रेसच्या उषा मेंढेे यांना १३ मते मिळाली. पंकज रहांगडाले यांना विजयी घोषित केले, तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर यांना ४० मते, तर काँग्रेसचे जितेंद्र कटरे यांना १३ मते मिळाली. यशंवत गणवीर यांना विजयी घोषित करण्यात आले. 
निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांचे दाेन्ही पक्षाच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या निर्मितीनंतर राष्ट्रवादीला प्रथमच पद 
- भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन १९९९ मध्ये गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर सन २०००मध्ये जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक घेण्यात आली. तेव्हापासून आठ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एकदाही पदाधिकारी झाली नव्हता. तर मागील निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसने भाजपसह अभद्र युती केल्याने सत्तेपासून दूर रहावे लागले होते, तर जुना हिशोब चुकता करण्याची आणि उपाध्यक्षपद मिळविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे चालून आली. त्यामुळे याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेसने करून घेतला. त्यामुळे तब्बल २३ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत प्रथमच पद मिळाले. 

भंडाऱ्यातील निवडणुकीचे गोंदियात पडसाद 

- भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन सहज स्थापन करू शकले असते. यासाठी राष्ट्रवादीकडून चर्चेसाठी पाऊल टाकण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून यासाठी कुठलाच सिग्नल मिळाला नाही. तर त्यांनी सुरुवातीपासूनच भाजपच्या एका गटासह चर्चा सुरू ठेवली होती. काँग्रेसने भाजपच्या एका गटासह हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करीत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले, तर स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा चर्चेसाठी कुठलीच तयारी दाखविली नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने गोंदिया जि. प.मध्ये भाजपसोबत जात सत्ता स्थापन केल्याची चर्चा आहे. 

हे ठरले किंगमेकर 
- जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी खासदार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी आ. संजय पुराम, माजी आ. खोमेश्वर रहांगडाले यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. 
पहिलीच निवडणूक अन् अध्यक्षपदी वर्णी 
nजिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झालेले पंकज रहांगडाले हे गोरेगाव तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसचे दिग्गज सदस्य पी. जी. कटरे यांचा पराभव करून प्रथम निवडून आले, तर जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड होणारे सर्वांत कमी वयाचे ते पहिलेच अध्यक्ष आहे. प्रथम जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करून जिल्ह्याचा सर्वांगीन विकास करणे यालाच आमचे प्रथम प्राधान्य राहिली. सर्वांना सोबत घेऊन कामे करण्याची आमची भूमिका राहूल. 
- विजय रहांगडाले आमदार, भाजप 
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन चर्चेसाठी नेहमीच काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले ठेवले होते. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नेत्यांकडून याला घेऊन कुठलीच चर्चा करण्यात आली नाही. उलट भंडारा जि. प.मध्ये त्यांनी वेगळी भुमिका घेतली. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाचा विचार करता सत्तेत राहून विकासाला गती देण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 
- राजेंद्र जैन, माजी आमदार
राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल २३ वर्षांनंतर जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी होऊन विकासकामे करण्याची संधी मिळाली आहे. याचा निश्चितच जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी फायदा होईल. 
- गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह चर्चा केली होती. त्यांनी याबाबत अनेकदा विश्वास देखील दाखविला होता. मात्र सत्ता स्थापन करताना त्यांनी वेगळी भूमिका घेतली. या मागे नेमके काय कारण हे त्यांनाच ठावूक. 
- दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

 

Web Title: The ticking of the clock along with the lotus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.