युतीचा त्रिकोण, सभापतीपदी कोण; विभागवार समतोल साधण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 03:07 PM2022-05-19T15:07:21+5:302022-05-19T15:11:44+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी १० मे रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर आता जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होणार आहे.

the triangle of the alliance, Election for the post of Zilla Parishad Subject Committee Chairman | युतीचा त्रिकोण, सभापतीपदी कोण; विभागवार समतोल साधण्याचा प्रयत्न

युतीचा त्रिकोण, सभापतीपदी कोण; विभागवार समतोल साधण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देराकाँ आणि चाबीला मिळणार प्रत्येकी एक सभापतीपद

गोंदिया :जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी संघटनेची मदत घेतली होती. युतीचा त्रिकोण करुन सत्ता स्थापन केल्याने विषय समिती सभापतीपदाचे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबीला प्रत्येकी एक सभापती मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण, सभापतीपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट केले नाही. त्यामुळेच युतीचा त्रिकोण पण सभापतीपदी कोण, याचे गूढ कायम आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी १० मे रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर आता जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांनी एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. यात अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर यांची वर्णी लागली. त्यामुळे सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांना प्रत्येकी एक विषयी समिती सभापतीपद देऊन दिलेल्या आश्वासनाची पूर्तत: करण्याचे नियोजन भाजपने केल्याची माहिती आहे.

अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य, समाज कल्याण, महिला बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन अशी एकूण पाच विषय समिती सभापतीपदे आहेत. अर्थ व बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य ही दोन्ही महत्वपूर्ण सभापतीपदे भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कृषी व पशुसंवर्धन आणि चाबीला महिला व बाल कल्याण सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. पण, यावर तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते एकत्र येऊन अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. रविवारी (दि. २२) याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. त्यातच सत्ता स्थापन करताना भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपमध्ये अंतर्गत धुसफूसदेखील आहे. त्यामुळे ही धुसफूस कमी करण्यासाठी काही मर्जीतील सदस्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आमगाव क्षेत्राला मिळणार का सभापतीपद

जि. प. विषयी समिती सभापतीपदाचे वाटप करताना पक्ष नेमके कोणते सूत्र लावते, हे महत्वपूर्ण ठरणार आहे. अध्यक्षपद तिरोडा विधानसभा मतदारसंघाला, तर उपाध्यक्षपद अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला देण्यात आले. त्यामुळे देवरी आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राला सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून हनवत वट्टी, तर राष्ट्रवादीकडून सुरेश हर्षे यांच्या नावांची चर्चा आहे. पण जी नावे चर्चेत असतात, त्यांची वर्णी लागत नसल्याचा अनुभव अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आला. पक्षाचे नेते काय भूमिका घेतात हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

विधान परिषदेची तयारी

जिल्हा परिषदेत विषयी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत चाबी संघटनेला एक सभापतीपद देऊन त्याचा उपयोग पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत करुन घेण्याच्या तयारीत भाजप नेते असल्याची माहिती आहे. यासाठी एका आमदाराने चाबीला एक सभापतीपद देण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह धरला असल्याची माहिती आहे.

सदस्यांनी घेतली चर्चेची धास्ती

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या नावांची सुरुवातीपासून चर्चा होती. ती नावे ऐनवेळी यादीतून बाद झाली. त्यामुळे विषयी समिती सभापतीपदासाठी नावांची चर्चा सुरु असली तरी आमची नावे सध्या छापू नका, असा आग्रह सदस्यांकडून धरला जात आहे. त्यामुळे सदस्यांनी चर्चेची धास्ती घेतल्याचे चित्र आहे.

Web Title: the triangle of the alliance, Election for the post of Zilla Parishad Subject Committee Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.