गणवेश तर सोडाच कापडाचाच पत्ता नाही
By कपिल केकत | Published: July 15, 2024 06:23 PM2024-07-15T18:23:13+5:302024-07-15T18:24:43+5:30
शाळा सुरू होऊन पंधरवडा लोटला : विद्यार्थी गणवेशविनाच शाळेत
कपिल केकत
गोंदिया : ‘समग्र शिक्षा’अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन जोड दिले जाणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात गणवेश द्या, असे शासनाकडून बोलले जाते. मात्र, आता शाळा होऊन पंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेले नाहीत. कारण, गणवेश तर सोडाच आतापर्यंत कापडाचा पत्ता नाही. अशात महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेश कधी शिवले जाणार व कधी वाटप होणार, हा एक प्रश्नच आहे.
एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने शासनाने शिक्षणाचा अधिकार अंमलात आणला. यातूनच स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर शिक्षणाचा आर्थिक बोजा येऊ नये, यासाठी शासनाकडूनच गणवेश व पुस्तकांचे वाटप केले जाते. यंदाही विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश वाटप केले जाणार होते. यातील एक जोड गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांकडून शिऊन वाटप करावयाचा होता. या गणवेशासाठी लागणारे कापड वितरित करण्यासाठी शासनाकडून कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्याला कापड प्राप्त झालेले नाही.
यामुळे आता शाळा सुरू होऊन पंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. विशेष म्हणजे, गणवेशासाठी कापड कटिंग पाठविले जाणार होते व बचत गटांना ते शिऊन गणवेश तयार करून द्यायचे आहेत. मात्र, कापडाचाच पत्ता नसल्याने कापड येणार कधी व गणवेश शिऊन मिळणार कधी, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांनाच नव्हे तर यंत्रणेलाही पडला आहे.
बालभारतीचे काम तंतोतंत
- विद्यार्थ्यांना गणवेश सोबतच पाठ्यपुस्तकांचेही वाटप केले जात असून, बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा केला जातो. यामध्ये जिल्ह्याकडून मागविल्यानुसार बालभारतीने पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करून दिला. त्या पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वाटप करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांवरच भागवून घ्यावे लागत आहे.
माविमला शिवायचे आहेत ७६,७९१ गणवेश
- महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बचत गटांच्या माध्यमातून गणवेश शिऊन घेणार असून, त्यांना ७६,७९१ गणवेश तयार करून द्यायचे आहेत. यासाठी माविमने नियोजन केले असून, त्यांची तयारी आहे. मात्र कापडच नसल्याने ते सुद्धा वाट बघत आहेत. नुकतेच भंडारा जिल्ह्याला कापड मिळाल्याची माहिती आहे. यामुळे काही दिवसांत गोंदियालाही कापड मिळणार अशी शक्यता आहे.
अशी आहे तालुकानिहाय विद्यार्थी संख्या
तालुका - विद्यार्थी संख्या
सडक-अर्जुनी- ७६७१
देवरी-६७२१
सालेकसा- ६७३७
आमगाव- ८२१५
गोरेगाव- ८१५६
तिरोडा- ११६२१
गोंदिया- १९,२८८
अर्जुनी-मोरगाव- ८३८२