घराची भिंत कोसळून आई-वडील व मुलगी गंभीर जखमी, उपचार सुरू
By अंकुश गुंडावार | Published: September 7, 2022 09:43 AM2022-09-07T09:43:04+5:302022-09-07T09:45:26+5:30
बावणकर यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गोंदिया - सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असतानाच घराची भिंत कोसळल्याने त्याखाली दबून आई-वडील व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे घडली. रामजी गंगाराम बावणकर (५५), श्यामकला रामजी बावणकर( ५०), सुरुची रामजी बावणकर (१९) असे गंभीर जखमी असलेल्यांची नाव आहे. तर निखिल रामजी बावनकर (२३) असे किरकोळ जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे. जखमींना गावकऱ्यांनी त्वरित गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (दि.६) रात्री जेवण करुन सर्व बावणकर कुटुंब झोपी गेले.
गाढ झोपेत असतानाच रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराची भिंत कोसळली. यात रामजी गंगाराम बावणकर (५५), श्यामकला रामजी बावणकर( ५०), सुरुची रामजी बावणकर (१९) हे दबल्याने गंभीर जखमी झाले. तर निखिल रामजी बावनकर हा किरकोळ जखमी झाला. दरम्यान मुलाने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले. त्यांनी भिंतीखाली दबलेल्या बावणकर कुटुंबीयांना बाहेर काढून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी गोंदिया येथे नेले. सध्या त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बावणकर यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मुलीचा होता आज पेपर
रामजी बावणकर यांची मुलगी सुरुची ही बी.ए.प्रथम वर्षाला शिकत असून आज तिचा पेपर होता. परंतु ती गंभीर जखमी असल्याने तिला परीक्षेपासून वंचित रहावे लागणार आहे.