तरुणाईला हवे चांगले शिक्षण, रोजगार तर वयोवृद्धांना रस्ते, आरोग्य सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:17 PM2024-11-18T16:17:42+5:302024-11-18T16:20:04+5:30

गोंदियाकरांच्या निवडून येणाऱ्या आमदारांकडून अनेक अपेक्षा : शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या द्या

The youth want good education, employment and the elderly want roads, health facilities | तरुणाईला हवे चांगले शिक्षण, रोजगार तर वयोवृद्धांना रस्ते, आरोग्य सुविधा

The youth want good education, employment and the elderly want roads, health facilities

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी लोकशाहीच्या या महोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान पार पडणार आहे.


राज्यात नवमतदार अर्थात पहिल्यांदाच मतदान करणारे १८ वर्षांवरील मतदार ते ८० वर्षांवरील मतदारही आपला मतदानाचा हक्क बजावणार याच मतदारांच्या निवडणूक, निवडून येणारे आमदार, सत्ताधारी, विरोधकांकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा 'लोकमत'ने प्रयत्न केला. यात तरुणाईने चांगले शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या हव्यात, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तर वयोवृद्धांनी त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उद्यानांसह उच्चतम दर्जाच्या आरोग्यसेवेकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी केली. 


"माझे पहिले मतदान आहे. शिक्षणासाठी नागपूर, पुणे येथे जावे लागते. गोंदिया परिसरात शिक्षणाबाबत चांगल्या संस्था उभारणे गरजेचे आहे. नवतरुण, तरुणी उच्च शिक्षण तर घेतात; मात्र पुढे नोकरी मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. यासाठी आमचे सरकार हवे आहे."
- लक्की हुकरे, तरुण मतदार, तेढा


"निवडणूक होते आणि दरवेळी आम्ही मतदान करीत आहोत; पण सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकायलाच तयार नाही. आमचे उतरते वय असल्याने आम्हाला आरोग्यसेवा चांगली हवी आहे. जिल्ह्यात चांगली सेवा मिळत नाही. वृद्धांना आजारपण दूर करण्यासाठी नागपूर गाठावे लागते. त्यासाठीही अनेकदा चकरा माराव्या लागतात. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे." 
- भाऊराव चिंचाळकर, विद्यानगरी, आमगाव.


"मतदान केंद्रावर पहिले पाऊल ठेवताना मनात एक वेगळाच उत्साह आणि जबाबदारीची भावना आहे. देशाच्या भवितव्यासाठी आपले मत किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव २० तारखेला प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. आपल्या हक्काचे संरक्षण आणि आपल्याला हवे असलेल्या व्यवस्थेसाठी उचललेले पहिले पाऊल आहे. आपणही मतदान करून आपल्या लोकशाहीची ताकद वाढवावी." 
- तेजस्विनी खोटेले, मतदार डोंगरगाव


"रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. चालता येत नाही. आमगाव येथे विरंगुळा केंद्रही नाही. फेरफटका मारायचा म्हटलं तर उद्यानेच नाहीत. सकाळी चालण्यासाठी मोकळी जागा नाही. स्थानिक नेत्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, एवढीच अपेक्षा आहे. मतदानातून चांगला आमदार निवडून देणे गरजेचे आहे." 
- अनिल पाऊलझगडे, मतदार, किडंगीपार


"मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. याबाबत खूप उत्सुकता आहे. जिल्ह्याचा विकास बघत आलोय, शिक्षणाविषयीच्या समस्या भेडसावत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. आम्हाला आमच्या समस्या सोडवणारे सरकार हवे आहे. त्यासाठी माझे मतदान आहे. तरुणांच्या हाताला काम देणारे सरकार हवे." 
- नरेश बोहरे, मतदार, रिसामा

Web Title: The youth want good education, employment and the elderly want roads, health facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.