...तर जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:36+5:302021-06-22T04:20:36+5:30
गोंदिया : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप मिळाली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक ...
गोंदिया : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप मिळाली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. येत्या आठ दिवसांत बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आमदार परिणय फुके यांनी दिला आहे.
सध्या शेतीची कामे सुरू झाली असून बी-बियाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना त्यांच्या हक्काचे बोनस अद्यापही देण्यात आले नाहीत. परिणामी धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी खरीप हंगामातील धानाची अजून उचल करण्यात आली नाही. त्यामुळे रब्बीतील धान खरेदी संथगतीने सुरू आहे. राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यातच बोनस देेणे अपेक्षित होते. मात्र, जून महिना लोटत असतानासुध्दा बोनस मिळालेला नाही. तर काही शेतकऱ्यांचे धानाचे चुकारेसुध्दा थकले आहेत. शासनाद्वारे बियाणांचा पुरवठा करण्यात येतो. तो देखील पूर्णपणे करण्यात आलेला नाही. परिणामी गरीब शेतकऱ्यांना खासगी दुकानातून महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी अडचणीत आहे. बोनसची रक्कम त्वरित न दिल्यास पणन कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आमदार परिणय फुके यांनी दिला आहे.