रूग्णवाहिकेलाच उपचाराची गरज
By Admin | Published: August 15, 2016 12:11 AM2016-08-15T00:11:36+5:302016-08-15T00:11:36+5:30
१०८ क्रमांकावरून मिळणारी तिरोडा येथील रूग्णवाहिका सतत नादुरूस्त असते. यामुळे तिरोडावासीयांना एकोडी येथील रूग्णवाहिका बोलवावी लागते.
नेहमीच नादुरूस्त : रूग्णांची होते गैरसोय
गोंदिया : १०८ क्रमांकावरून मिळणारी तिरोडा येथील रूग्णवाहिका सतत नादुरूस्त असते. यामुळे तिरोडावासीयांना एकोडी येथील रूग्णवाहिका बोलवावी लागते. यात चालक व संबंधित कर्मचारीच संगनमत करून गोंदियाला रूग्ण नेण्यास टाळतात की खरोखरच रूग्णवाहिका नादुरूस्त आहे हे कळणे कठीण आहे. मात्र संबंधित कर्मचारी व या रूग्णवाहिकेलाच उपचाराची गरज दिसून येत असल्याचे नागरिक बोलत आहेत.
शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. मात्र आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनाच आपले आरोग्य आणखी बिघडावे लागत असेल तर त्या सेवेचे फलीत काय? असा सवाल नागरिक करतात. यासाठी कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, को-आॅर्डिनेटरचा निष्काळजीपणा व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचा अभाव या बाबी कारणीभूत ठरत आहेत. या प्रकाराने एखाद्यावेळी रूग्ण दगावण्याचीच शक्यता अधिक असते.
रूग्णास घरापासून रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सोय आहे. गोंदिया जिल्ह्यास १०८ क्रमांकाच्या अशा १२ रूग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी गोंदियात दोन, तिरोडा येथे एक, एकोडी येथे एक अशाप्रकारे रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. १०८ क्रमांकावर फोन लावताच पुणेवरून आपल्याला रूग्णाचे नाव व स्थळ विचारले जाते. त्यानंतर जवळच्या रूग्णालयातील डॉक्टरांशी बोलणे करून दिले जाते. दिलेल्या पत्त्यावर एक डॉक्टर चालकासह रूग्णवाहिका घेवून येतो व रूग्णाला रूग्णालयापर्यंत पोहोचविले जाते. १०८ क्रमाकांच्या रूग्णवाहिकेद्वारे ही सोय नि:शुल्क असते. शिवाय अत्यावश्यक सेवा असल्याने ही रूग्णवाहिका अद्ययावत ठेवणे आवश्यक असते.
मात्र तिरोडा येथील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बिघडली आहे, असे सदर रूग्णवाहिकेचा चालक सांगतो. एकदाच नव्हे तर असे प्रकार अनेकदा घडले आहेत. शिवाय ही शासकीय रूग्णवाहिका तिरोडा येथील एका खासगी रूग्णालयासमोर नेहमीच उभी करून ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये शंकाकुशंकेचे वातावरण पसरले आहे. तिरोडा येथून १०८ क्रमांकावर फोन लावल्यानंतर ही रूग्णवाहिका रूग्णाच्या घरी येते. मात्र, आम्ही रूग्णाला तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयातच पोहोचवू शकतो.
या रूग्णवाहिकेमध्ये बिघाड असल्यामुळे गोंदियाला जिल्हा रूग्णालयात पोहोचवू शकत नाही, असे चालकाचे नेहमीचेच उत्तर असते. मग रूग्णवाहिकेत बिघाड असेल तर तिरोड्यातच रूग्णाला कसे पोहोचविले जाते? असा प्रश्न निर्माण होतो. खरोखर बिघाड असेल तर इमरजंसी सेवेचे हे वाहन मागील तीन-चार महिन्यांपासून नादुरूस्त कसे? असा सवाल नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)
या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज
तिरोडा शहरातील १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेचे किंवा तिचे संचालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत गंभीर बाब असून याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. रूग्णवाहिकेची अशीच स्थिती राहिल्यास १०८ क्रमांकाच्या या सुविधेचा फायदाच काय राहणार. शिवाय सेवेअभावी भविष्यात तिरोड्यातील अनेक गंभीर रूग्ण दगावण्याचीच शक्यता अधिक आहे.