चारही प्रकल्पांच्या ११० रजिस्ट्री लांबल्या
By admin | Published: May 26, 2017 12:32 AM2017-05-26T00:32:25+5:302017-05-26T00:32:25+5:30
गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
१८७ रजिस्ट्री लागल्या
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे चारही प्रकल्प पूर्णत्वास गेले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल. आतापर्यंत सदर चारही मध्यम प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या १८७ रजिस्ट्रीचे काम पूर्णत्वास गेले असून सातबारा अपडेट होण्याच्या विलंबामुळे ११० रजिस्ट्रींचे काम लांबले आहे.
गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत रजेगाव-काटी, कलपाथरी, कटंगी व तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. यात सद्यस्थितीत रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत ८२ रजिस्ट्री लागल्या असून २१ बाकी आहेत. कटंगी मध्यम प्रकल्पांतर्गत २० रजिस्ट्री लागल्या असून ८ बाकी तर तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांतर्गत पाच रजिस्ट्री लागल्या असून दोन बाकी आहेत. सर्वाधित बाकी असलेल्या रजिस्ट्रीमध्ये कलपाथरी मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. कलपाथरी प्रकल्पांतर्गत ८० रजिस्ट्री लागल्या असून ७९ बाकी आहेत.
उल्लेखनिय म्हणजे काही सातबारावर १५ ते २५ लोकांची नावे आहेत. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यातच सातबारा अपडेट न झाल्याने रजिस्ट्रीची प्रक्रिया लांबणीवर गेल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. तर काहींची रजिस्ट्री झाल्यानंतर फेरफारचे कामही प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कलंगटोला येथे एका सातबारावर तब्बल ३८ जणांची नावे असून सर्वच जणांचा मृत्यू झाला आहे. असे प्रकार समोर येत असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर जात आहे.
सर्वाधिक रजिस्ट्री बाकी असलेल्या गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या दोन कालव्यांचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. सदर काम जून अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर सदर प्रकल्पाला व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतर करण्यात येईल व तेच विभाग त्याचे मेंटेनंस करणार आहे. मात्र अद्यापही ८ हेक्टरचे भू संपादन बाकीच आहे.
कलपाथरी प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता सन १९८४ मध्ये मिळाली. त्यावेळी त्याची मूळ प्रशासकीय किंमत २०२.५८ लाख होती. तर सुधारित मान्यता सन २०१६ मध्ये मिळाली असून सुधारित प्रशासकीय किंमत ८०१०.१२ लाख एवढी आहे. सदर प्रकल्पाची दोन हजार ५५९ हेक्टर सिंचन क्षमता आहे. पूर्वी दोन गावे पाण्याखाली गेली होती. त्या गावांचे पुनर्वसन गोरेगावजवळ श्रीरामपूर येथे करण्यात आले.
सदर प्रकल्प पूर्ण जवळपास पूर्णच झाले असून यात मागील सहा वर्षांपासून पाणीसाठी असतो. या प्रकल्पाचा पूर्ण साठा ८.६० दलघमी असून उपयुक्त पाणीसाठी ६.५९ दलघमी आहे. धरण लांबी १ हजार ९६० मीटर आहे. बुडीत क्षेत्र ४१५.१८ हेक्टर व कालव्याखाली ७९.७८ हेक्टर क्षेत्र आहे.