हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत होतेय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:11 AM2019-08-10T00:11:31+5:302019-08-10T00:12:23+5:30
जंगल व्याप्त गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळतात. या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रूग्णात ७५.४३ टक्यांनी घट झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जंगल व्याप्त गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळतात. या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रूग्णात ७५.४३ टक्यांनी घट झाली आहे. सदर कालावधीत पीएफ रूग्ण संख्येत सुध्दा ८०.५५ टक्के घट झाली आहे. जुलै २०१८ व जुलै २०१९ या महिन्यांची आकडेवारी पाहता हिवतापग्रस्त रूग्णांत ८१.५६ टक्के व पीएफ रूग्ण संख्येत ८६.२५ टक्यांनी घट झाली आहे. या कालावधीत हिवताप आजाराने एकही मृत्यू झाला नाही.
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या तसेच वरिष्ट कार्यालयाच्या सुचनेनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे राबविण्यात येणाऱ्या किटकजन्य रोग नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाययोजनेनुसार गोंदिया जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) या आजाराच्या रूग्ण संख्येत बरच्याच प्रमाणात घट झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजेंतर्गत जनतेच्या किटकजन्य आजारांबाबत बचावाकरीता घर व परिसर, स्वच्छ ठेऊन परिसरातील झुडपी वनस्पती व गवत नष्ट करावे, घरातील पाणी वापराचे साठे घासून पुसून आठवड्यातून एकदा कोरडे करावे, घरातील पाणी साठे, हौद टाके, रांजन, ड्रम व घरावरील टाकी, गुरांना व पक्ष्यांना पाणी देण्याच्या साधनांमध्ये पाणी साठवू न देण्याची तरतूद करावी. कुलर, फुलदान्या, कुंड्यांमधे पाणी साठवू देऊ नये.शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा कोरडे करावे. शौचालयाच्या व्हेंट पाईपला कापड किंवा जाळ्या बांधावे, तुंबलेल्या नाल्या व गटारे वाहते करावे, व पाणी साचणारे मोठी डबकी, खड्डे बुजवावे. मच्छरदाणीचा वापर करावा. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत आदी माहिती देण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या माध्यामातून नियमीत गृहभेटी, कंटेनर, सर्वेक्षण,जलदताप रूग्ण सर्वेक्षण, हिवताप दूषीत रूग्ण आढळल्यास त्वरीत उपचार करण्यात येते.
चालू वर्षात फक्त ४४ रूग्ण
सन २०१८ मध्ये एकूण २ लाख २६ हजार ४२ रूग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आले.त्यात २३२ हिवतापाचे रूग्ण आणि पीएफचे १८० रूग्ण आढळले. सन २०१९ मध्ये २ लाख ४१ हजार २२२ रूग्णांचे रक्त तपासण्यात आले.त्यात ५७ हिवतापाचे रूग्ण आढळले त्यात पीएफचे ३५ रूग्ण आढळले. सन २०१८च्या जुलै महिन्यापर्यंत ४४ हजार २१ रूग्णांचे रक्त तपासण्यात आले.त्यात १४१ हिवतापाचे रूग्ण आढळले त्यात पीएफचे १३१ रूग्ण आढळले. सन २०१९ च्या जुलै महिन्यापर्यंत ५० हजार ४५५ रूग्णांचे रक्त तपासण्यात आले.त्यात २६ हिवतापाचे रूग्ण आढळले त्यात पीएफचे १८ रूग्ण आढळले.
ताप आल्यास त्वरीत रक्त तपासणी करा.डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर करा.आजूबाजूचा परिसरात स्वच्छता ठेवा,पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
-डॉ. वेदप्रकाश चौरागडे
जिल्हा हिवताप अधिकारी, गोंदिया.