कोरोना लस घेण्याकडे नागरिकांचा वाढतोय कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:12+5:302021-03-05T04:29:12+5:30
गोंदिया : कोरोना लसीकरणांतर्गत आता ४५ वर्षांपेक्षा वरील व ठरवून दिलेले काही आजार असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला सोमवारपासून (दि.१) सुरुवात ...
गोंदिया : कोरोना लसीकरणांतर्गत आता ४५ वर्षांपेक्षा वरील व ठरवून दिलेले काही आजार असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला सोमवारपासून (दि.१) सुरुवात करण्यात आली आहे. यांतर्गत ३ दिवसांत जिल्ह्यातील १२२१ नागरिकांनी स्वत: लस घेतली आहे. यात खासगी रुग्णालयांमध्येही नागरिक लस घेत आहेत. यावरून कोरोनापासून बचावासाठी नागरिकांचा कल लसीकरणाकडे दिसून येत आहे.
सन २०२० पूर्णपणे गिळंकृत करणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी देशात २ लसींना मंजुरी देण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला देशात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कोरोना वर्कर्सलाच लस दिली जात होती. मात्र, कोरोना लसीकरणाची गती वाढवून सोमवारपासून (दि.१) ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांपेक्षा वरील व्यक्ती व ज्यांना काही दुर्धर आजार आहेत, त्यांना आता लस दिली जात आहे. विशेष म्हणजे, कोरोना लसीकरणाला गती यावी यासाठी आता महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनंतर्गत नोंदणीकृत असलेल्या खासगी रुग्णांलयातूनही लसीकरण केले जात आहे. यासाठी मात्र संबंधित नागरिकांना २५० रुपये प्रतिडोस एवढे शुल्क आकारले जात आहे. अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनापासून आपला बचाव व्हावा यासाठी आलेल्या लसीला घेऊन सुरुवातीला काही संभ्रम निर्माण झाले असतानाच आता मात्र नागरिकांचा कल लस घेण्याकडे वाढताना दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत १२२१ नागरिकांनी स्वत: लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली आहे. यामध्ये ७०४ व्यक्तींनी सरकारी रुग्णालयात तर ५१७ व्यक्तींनी खासगी रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे.
---------------------------
५ खासगी रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात
लसीकरणासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये केंद्र देण्यात आले असतानाच आता शहरातील खासगी रुग्णालयांतही लसीकरण केंद्र सुरू केले आहे. यात सोमवारी या पहिल्या खासगी केंद्रातून लसीकरण झाले नाही. मात्र, मंगळवारी ४ तर बुधवारी ५ खासगी केंद्रांतून लसीकरणाला सुरुवात झाली. यात मंगळवारी ४ रुग्णालयांतून २०० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. तर बुधवारी ३१७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.