कार्यकर्त्यांनो विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा - प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:53 AM2023-08-25T11:53:35+5:302023-08-25T11:55:52+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेशी तडजोड नाही

There is no compromise with the basic ideology of NCP - Praful Patel | कार्यकर्त्यांनो विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा - प्रफुल्ल पटेल

कार्यकर्त्यांनो विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा - प्रफुल्ल पटेल

googlenewsNext

गोंदिया : कुठल्याही भीतीने अथवा कुठल्याही लालसेपोटी आम्ही युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला नाही. राज्य व जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. त्यामुळे विरोधक आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण कार्यकर्त्यांनो तुम्ही या टीकेकडे दुर्लक्ष करा, तुमचे लक्ष केवळ जिल्ह्याच्या विकासाकडे केंद्रित करून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावा, असा सल्ला खा. प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी (दि. २४) गोंदिया येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला.

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बाेलत होते. पटेल म्हणाले, गोंदिया व भंडारा जिल्हा व राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. भंडारा व गोंदिया जिल्हा म्हणजे माझे कुटुंब आहे. या कुटुंबात कोणावरही अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकरी व शेतमजूर सक्षम व्हावा, समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेशी कधीही तडजोड करणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवरच पक्षाची यापुढे वाटचाल कायम राहील, अशी ग्वाही पटेल यांनी दिली.

घड्याळ आमचे आहे आमचेच राहणार

राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचा निर्णय लवकरच निवडणूक आयोगाकडून होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्या मूळ विचारधारेवर झाली ती सदैव कायम राहील. घड्याळ हे आपले होते आणि यापुढेही ते आपलेच राहील. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी खा. पटेल यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचे आवाहन माजी आ. राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांना केले.

त्या शेतकऱ्यांचे चुकारे त्वरित द्या

गोंदिया तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे मिळाले नाहीत. यामुळे दोन हजारांवर शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कार्यक्रमस्थळी खा. प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन चुकारे मिळाले नसल्याचे सांगितले. खा. पटेल यांनी थेट उपमुख्यमंत्री व मार्केटिंग फेडरेशनचे संचालक तेलंग यांच्याशी चर्चा केली. तसेच तेलंग यांना शेतकऱ्यांचे चुकारे त्वरित देण्यास सांगितले. तेव्हा तेलंग यांनी आठ दिवसात चुकारे देणार असल्याचे पटेल यांना सांगितले.

Web Title: There is no compromise with the basic ideology of NCP - Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.