गोंदिया व तिरोडा आगारात डिझेलबंदी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:39+5:302021-08-17T04:34:39+5:30
कपिल केकत गोंदिया : मागील वर्षापासून कोरोनाने देशात कहर केला आहे. याचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहेत. विशेष ...
कपिल केकत
गोंदिया : मागील वर्षापासून कोरोनाने देशात कहर केला आहे. याचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, मागीलवर्षी पहिल्या लॉकडाऊन काळापासून राज्य रस्ते परिवहन महामंडळाला घरघर लागली असून त्याचे पडसाद आतापर्यंत दिसत आहेत. मध्यंतरी परिस्थिती सुधारत असतानाच दुसऱ्या लाटेने कहर केला व पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत एसटीला प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी अद्याप आगारांच्या फेऱ्या पूर्णपणे सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे महामंडळाला चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. यातूनच आता महामंडळाने आगारांचे डिझेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुदैवाने अद्याप तरी जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारांवर अशी वेळ आलेली नाही. दोन्ही आगारांना वर्षभरात कोरोनामुळे कोट्यवधींचा फटका बसला आहे. मात्र उत्पन्नासाठी दोन्ही आगारांकडून प्रयत्नही केले जात आहेत, यात शंका नाही.
---------------------------
जिल्ह्यातील आगार आणि कोरोना काळात झालेला तोटा
आगार तोटा
गोंदिया १६,४२,५०,०००
तिरोडा १२,७७,५०,०००
-------------------------------------
आगारांच्या डिझेलवर परिणाम नाही
जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार आहेत. कोरोना काळात म्हणजेच आता सुमारे वर्षभरात या दोन्ही आगारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही आगारांकडून हा फटका भरून काढण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. त्यामुळेच आतापर्यंत तरी या आगारांचे डिझेल बंद करण्यात आलेले नाही.
------------------------------
१२ बसेस आगारातच
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती आजही कित्येकांच्या मनातून गेलेली नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलाच कहर केल्याने आतापर्यंत ग्रामीण प्रवाशांनी बाहेर पडणे टाळले आहे. शिवाय आपल्या खासगी वाहनांनीच प्रवासाला प्राधान्य दिले आहे. परिणामी प्रवासी प्रतिसाद नसल्याने आगारांनी फेऱ्या कमी केल्या आहेत. यामुळेच गोंदिया आगाराच्या फक्त १२ बसेस आगारातच उभ्या आहेत.
------------------------------
बसेस चालविण्यासाठी सर्वात मोठा खर्च म्हणजे डिझेलचा आहे. कोरोनामुळे नक्कीच आगारांचे उत्पन्न घटले असून त्याचा फटका महामंडळालाही बसला आहे. यातूनच डिझेलबंदी केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारांची डिझेलबंदी झालेली नाही.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया.
४) नियंत्रकाचा कोट