जिल्ह्यात प्रमाणित सेंद्रिय शेतीच नाही
By admin | Published: August 21, 2014 11:57 PM2014-08-21T23:57:03+5:302014-08-21T23:57:03+5:30
सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गोंदिया : सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यावर्षी जिल्ह्यात १६ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रात श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी एका एकर शेतजमिनीत पाच किलोप्रमाणे बियाणे घालण्यात आले. मागील वर्षीही श्रीपद्धतीने जवळपास १५ ते १५ हेक्टर जमिनीत लागवड करण्यात आली, असे कुरील यांनी सांगितले.
सेंद्रिय शेती करणे अत्यंत जिकरीचे काम असते. सतत तीन वर्षांपर्यंत सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतल्यानंतरच ती शेती सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित केली जाते. सेंद्रिय शेतीसाठी ते क्षेत्र इतर शेतापासून संपूर्णपणे वेगळे करावे लागते. दुसऱ्या रासायनिक शेतातील पाणी त्या शेतात कधीच शिरू नये, याची काळजी घ्यावी लागते. सेंद्रिय शेतीला मिळणारे पाणी रासायनिक खते व पेस्टीसाईड्सपासून मुक्त असणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीसाठी युरोगॅप या विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो.
या पद्धतीसाठी युरोपियन देशांनी काही मानके ठरविली आहेत. यात सर्वात आधी साईल टेस्टींग केली जाते. कीटकनाशकांचे परिणात नष्ट करावे लागतात. सेंद्रिय पदार्थांतूनच जनावरांसाठी चारा तयार करावा लागतो. नंतर त्याच जनावरांच्या शेणाचे खत सेंद्रिय शेतीसाठी उपयोगात आणावे लागते.
मजुरांची स्वच्छता यावर मोठा भर असतो. मजूर शौचास जरी गेला तरी विशिष्ट अशा साबणाने त्याला आपले हात स्वच्छ करून घ्यावे लागते. सेंद्रिय शेतात दर दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या एजंसीचे माणसे येवून तपासणी करून जातात. या सर्व प्रकारामुळे सेंद्रिय शेती करणे अत्यंत जटिल असल्यामुळे शेतकरी ही शेती करण्यास सहजासहजी धजावत नाही.
सेंद्रिय शेती करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी आहेत. एमआरएलमुळे (मॅक्सीमम रेसीड्युअल लेवल) सेंद्रिय शेती रासायनिक शेतीला पर्याय ठरू शकते. एमआरएल हे नागपूर येथे असून येथे उत्पादित झालेल्या धान्यातील ३२ प्रकारच्या केमिकल्सची तपासणी केली जाते.
धानपीकच नव्हे तर फळभाज्यांसाठी सुद्धा आपण सेंद्रिय शेती करू शकतो. रासायनिक खतांना एका स्तरावर नियंत्रित ठेवून, उत्पादकता कमी न करता सेंद्रिय अन्नाचे उत्पादन घेतले जावू शकते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)