नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:39 PM2018-07-08T22:39:49+5:302018-07-08T22:40:23+5:30
नवीन शैक्षणिक सत्रानुसार मागील वर्षी नगर परिषदेने सुरू केलेल्या ११ कॉन्हेंटचाही ठोका वाजला आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्यांना शिकविण्यासाठी अद्याप शिक्षकांची भर्ती करण्यात आलेली नाही.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवीन शैक्षणिक सत्रानुसार मागील वर्षी नगर परिषदेने सुरू केलेल्या ११ कॉन्हेंटचाही ठोका वाजला आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्यांना शिकविण्यासाठी अद्याप शिक्षकांची भर्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशीत चिमुकल्यांना बसवून ठेवले जात आहे. अभ्यासाच्या नावावर या चिमुकल्यांचा एकप्रकारे खेळच मांडला जात असल्याचे आता बोलले जात आहे.
खाजगी कॉन्व्हेंटमधील महागड्या शिक्षणापासून गरिबांची सुटका व्हावी म्हणून नगर परिषदेने मागील वर्षी कॉन्व्हेंटचा प्रयोग केला. नगर परिषदेच्या शाळांना जोडून ११ कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक सत्रानुसार नगर परिषद शाळांसोबतच या कॉन्व्हेंटचाही ठोका वाजला आहे. मात्र या आश्चर्याची व तेवढीच मनस्तापाची बाब अशी की, आता १५ दिवसांचा कालावधी लोटत असतानाही या कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्यांना शिकविण्यासाठी अद्याप शिक्षकांची भर्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशीत चिमुकल्यांना बसवून ठेवले जात असल्याची माहिती आहे.
चांगले शिक्षण मिळावे यासाठी कोणतेही मायबाप आपल्या पोटाला चिमटा देवून मुलांना चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये टाकत आहेत. अशात नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमध्ये टाकल्यास चांगले शिक्षण मिळेल, शिवाय पैसेही वाचतील या उद्देशातून नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमध्ये सध्या सुमारे २४२ चिमुकल्यांचा प्रवेश झालेला आहे. मात्र नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमध्ये टाकल्यानंतरही पालकांचा उद्देश पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. उलट शिक्षक नसतानाही चिमुकल्यांना कॉन्व्हेंटमध्ये बोलावून त्यांना फक्त बसवून ठेवले जात असल्याची माहिती आहे.
१० शिक्षिकांचा प्रस्ताव पडून
नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून कॉन्व्हेंटसाठी १० शिक्षिकांची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या गोष्टीला आता आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकांच्या मागणीचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे कॉन्व्हेंटमधील शिक्षिकांची भर्ती अडकून आहे. शाळा सुरू झाल्या मात्र शिक्षकच नाही हा प्रकार ऐकून सर्वांनाच हसू व तेवढाच रागही येत आहे. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात होत असलेली दिरंगाई बघून नगर परिषदेचे कामकाज किती सुरळीत सुरू आहे याची प्रचिती येते.