बालक-गर्भवतींसाठीही व्हेंटीलेटरच नाही
By admin | Published: June 29, 2016 01:40 AM2016-06-29T01:40:12+5:302016-06-29T01:40:12+5:30
जिल्ह्यातील एकमेव सरकारी महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर दिवस-रात्र बाळंतपण सुरू असते.
गोंदिया : जिल्ह्यातील एकमेव सरकारी महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर दिवस-रात्र बाळंतपण सुरू असते. पण या रुग्णालयात बालकांसाठी व्हेंटीलेटरची (कृत्रिम जीवनरक्षक यंत्र) सोय नाही. नियमानुसार बालकांसाठी या रुग्णालयात व्हेंटीलेटर ठेवताच येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळेच अनेक अनेक वर्षांपासून बालमृत्यू होत आहेत.
विशेष म्हणजे बालकांसाठी व्हेंटीलेंटरची परवानगी नसली तरी माता मृत्यू वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरची परवानगी असताना ते सुद्धा लावण्यात आलेले नाही. आरोग्य प्रशासनाच्या या उदासीनमुळे अनेकांची जीव जात आहेत. व्हेंटीलेटर लावण्यासाठी आता हाय डिपेंडन्सी युनिट तयार करण्यात येत असल्याचे गंगाबाई रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय लेवल टू सुविधेचे हॉस्पीटल आहे. तर लेवल वन चे हॉस्पीटल मेडीकल कॉलेज असते. लेवल वन मध्ये व्हेंटीलेटर असणे आवश्यक असल्याचे शासनाने ठरविले. बाई गंगाबाई रुग्णालयात बालकांसाठी व्हेंटीलेटर असणे आवश्यक नाही. परंतु महिलांसाठी व्हेंटीलेटरची सोय या रुग्णालयात खाटांच्या संख्येनुसार असणे आकश्यक आहे. गंगाबाई स्त्री रुग्णालयात सुरुवातीला ८० खाटांचा दर्जा होता. त्यानंतर १२० खाटा व २०११ मध्ये २०० खाटांचा दर्जा देण्यात आला. या २०० खाटांनुसार महिलांसाठी गंगाबाई रुग्णालयात व्हेंटीलेटर ठेवणे आवश्यक आहे. परंतु महिलांसाठी आतापर्यंत व्हेंटीलेटर उपलब्ध नाही. त्या महिलांना आता व्हेंटीलेटरची सेवा देण्यासाठी हाय डीपेडन्सी युनिट तयार करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा शल्य चिकित्सकांनी सोय करावी
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात महिलांचा व १२ वर्षाखालील मुलांचा उपचार केला जातो. परंतु १२ वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांचा उपचार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येतो. बालकांच्या उपचारासाठी व्हेंटीलेटरची सोय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. परंतु केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर १३ वर्षापासून त्यावरील बालकांना ही उपचारासाठी बाई गंगाबाई रुग्णालयात पाठवितात. जिल्हा शल्य चिकित्सकांनी १२ वर्षावरील मुलांचा उपचार करण्यासाठी त्यांनी सोय करायला हवी.
व्हेंटीलेटरसाठी मनुष्यबळही नाही
खासगी रुग्णालयात व्हेंटीलेटरवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला दिवसाकाठी १० हजार रुपये खर्च येतो. एकाच दिवसात आॅक्सीजनचे तीन सिलेंडर खर्च होतात. व्हेंटीलेटर कक्षाला स्वच्छ वातानुकुलीत खोली असणे आवश्यक आहे. या व्हेंटीलेटरला हाताळणारा तज्ञ स्टॉप असणे आवश्यक आहे. परंतु मनुष्यबळ ही नाही व व्हेंटीलेटरही नाही, अशी अवस्था गंगाबाई रुग्णालयाची आहे.
२०० खाटांसाठी जागाच नाही
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाला २०११ मध्ये २०० खाटांचा दर्जा मिळाला. परंतु जागेअभावी या रुग्णालयात आतापर्यंत १२० खाटाच आहेत. उर्वरीत खाटा लावण्यासाठी नवीन इमारत तयार करण्यात आली. परंतु त्या इमारतीला मेडीकल कॉलेजसाठी देण्यात आल्यामुळे गंगाबाईच्या खाटा वाढविता आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.